Ambadas Danve : यंत्रणा वापरून भाजपचा कुटील डाव अंबादास दानवे यांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambadas Danve

Ambadas Danve : यंत्रणा वापरून भाजपचा कुटील डाव अंबादास दानवे यांचा आरोप

औरंगाबाद : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण लोकांच्या मनामनात रुजले, हेच विरोधक आणि भाजपच्या मनात खटकत होते. त्यामुळे शिवसेनेला थेट पराभूत करणे शक्य न झाल्याने शिवसेनेत गद्दारी करायला लावून आणि वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणाऱ्या भाजपचा हा कुटील डाव आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तसेच जनतेच्या दरबारात शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही असा विश्वास व्यक्त करून याचा खंबीरपणे मुकाबला केला जाईल असे स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्याच्या अनुषंगाने रविवारी (ता. नऊ ) माध्यमांशी संवाद साधताना श्री दानवे बोलत होते. ते म्हणाले , यंत्रणा कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहे की काय असे वाटायला वाव आहे. शिंदे गटाचा याचसाठी अट्टाहास होता की काय असा आता प्रश्न पडत आहे .

१९६६ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी स्थापन केलेली शिवसेना आहे. ती संपवण्यासाठी भाजपने केलेला हा कुटील डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात झळाळी प्राप्त झालेले एक नेतृत्व आहे.

अशा नेतृत्वाशी समोरासमोर लढता येत नाही , म्हणून भाजपकडून हे काम करण्यात आलेले वाटते. गद्दारांची आणि खोकेवाल्यांची शिवसेना यांनीही आता शिंदें यांच्या नावावर समोर यावे मग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावात ताकद आहे की गद्दाराच्या नावात ताकद आहे, हे येणाऱ्या काळात दिसेल . हा निर्णय जरी वेदनादायी असला तरी, शिवसैनिकांनी अशा अनेक वेदना सहन केल्या आहेत . संघर्ष सहन केला आहे . यातूनही शिवसेना नव्या उत्साहाने , जोमाने काम करेल असा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विश्वास व्यक्त केला.