फोटो- शिवलिंग ABD26J78883
ज्योतीनगर ः येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहात पार्थिव शिवलिंगार्चन सोहळ्यात सहभागी महिला.
--
पार्थिव शिवलिंगार्चन सोहळ्याला भक्तिमय प्रारंभ
तीन दिवसांत सव्वा लाख शिवलिंग निर्मितीचा संकल्प; ज्योतीनगरात शिवभक्तीचा जागर
ज्योतीनगर, ता. ८ ः मातीच्या कणाकणांत शिवनामाचा गजर आणि हातोहात साकारले जाणारे शिवलिंग अशा भक्तिमय वातावरणात श्रावण मासातील पार्थिव शिवलिंगार्चन सोहळ्याला सोमवारी (ता. सात) ज्योतीनगर येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहात उत्साहात प्रारंभ झाला. या तीनदिवसीय सोहळ्यात भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले आहेत.
श्री विठ्ठल मंदिर परिसरातील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराच्या सान्निध्यात ७ ते ९ सप्टेंबर हा सोहळा होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत परिसरातील शिवभक्तांनी शास्त्रोक्त पद्धतीने मातीची शिवलिंगे तयार केली. शिवनामस्मरण करत तब्बल २० हजार पार्थिव शिवलिंगांची निर्मिती केली. सायंकाळी सहाला वेदशास्त्री सुनील अत्रे गुरुजी, कांता गुरुजी व प्रमोद जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली वेदशास्त्री शामशास्त्री जोशी गुरुजी यांच्या मुख्य उपस्थितीत विधिवत पूजा केली. ब्रह्मवृंद अमोल देशमुख व कैलास जोशी गुरुजी यांनी सहकार्य केले. अकरा यजमानांच्या हस्ते रात्री आठपर्यंत पूजाविधी पार पडला. त्यानंतर सामूहिक महाआरती करण्यात आली. एकादशी असल्याने उपस्थित भाविकांना उपवासाच्या फराळाचा महाप्रसाद देण्यात आला.
पूजेसाठी बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ, मल्लिकार्जुन व महाकाल या तीन शिवलिंगांची निवड करण्यात आली आहे. महादेवाला साजशृंगार, धूप, नैवेद्य व आरतीसह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात येणार आहे.
-------