ABD26J82225 खांडेगाव : शॉर्टसर्किटमुळे पांगरा सती येथे जळालेला ऊस.
----
शॉर्टसर्किटमुळे आग; दोन एकरांतील ऊस खाक
----
खांडेगाव, ता. २८ (बातमीदार) ः महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे पांगरा सती (ता. वसमत) येथील एका शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतातून गेलेल्या ३३ केव्ही वीज वाहिनीच्या लोंबकळणाऱ्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचा उभा ऊस जळून खाक झाला असून, महावितरणने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संतप्त शेतकऱ्याकडून होत आहे.
पांगरा सती येथील शेतकरी शिवाजी कदम यांची गट क्रमांक १९० मध्ये शेती असून, त्यांनी या गटात ७३ गुंठे क्षेत्रावर उसाची लागवड केली होती. त्यांच्या शेतातून ३३ केव्हीची अकोली फिडरची लाइन गेलेली असून, यासाठी रोवण्यात आलेले पोल लांब अंतरावर असल्याने त्यावरील तारा लोंबकळत होत्या. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे यापूर्वीही अनेकदा शॉर्टसर्किट झाल्याने याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. मात्र, कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत कोणतीही दुरुस्ती किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नसल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी (ता. २६) सकाळी अकराच्या सुमारास लोंबकळणाऱ्या तारांमध्ये पुन्हा शॉर्टसर्किट झाले. उडालेल्या ठिणग्यांनी शेतातील उसाने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, अग्निशामक दलास पाचारण केल्याने आग अटोक्यात आली. असे असले तरी कदम यांचे मोठे नुकसान झाले आहे.