मोबाईलच्या मदतीने शिकल्या रांगोळीचे बारकावे; १० बाय ६ फुटांच्या रांगोळीतून देवीचे साकारले रूप

मोबाईलच्या मदतीने शिकल्या रांगोळीचे बारकावे; १० बाय ६ फुटांच्या रांगोळीतून देवीचे साकारले रूप
Published on: 
ABD26J81913 छत्रपती संभाजीनगर ः शुभदा देशमुख यांनी रांगोळीतून साकारलेली माता सरस्वती देवीची प्रतिमा. --- मोबाइलच्या मदतीने शिकल्या रांगोळीचे बारकावे ---- शुभदा देशमुखांनी दहा बाय सहा फुटांच्या रांगोळीतून देवीचे साकारले रूप ------ छत्रपती संभाजीनगर, ता.२२ (बातमीदार) : लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेल्या शुभदा पराग देशमुख आजेगावकर यांनी रांगोळी कलेतून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. कोणत्याही प्रकारचे औपचारिक प्रशिक्षण न घेता केवळ मोबाइलच्या मदतीने रांगोळीतील बारकावे आत्मसात करत त्यांनी मोठ्या आकाराच्या रांगोळ्या साकारण्यापर्यंत मजल मारली. नवरात्रोत्सवानिमित्त त्यांनी श्री सरस्वती मातेची १० बाय ६ फुटांची आकर्षक रांगोळी साकारली असून, ती पूर्ण करण्यासाठी त्यांना चार दिवसांत २० ते २२ तास लागले. शुभदा पराग देशमुख आजेगावकर या सध्या साई संकेत पार्क, हिवाळे लॉन्ससमोर, बीड बायपास येथे वास्तव्यास आहेत. लहानपणापासून त्यांना चित्र काढण्याची आवड होती. लग्नानंतर हीच आवड रांगोळी कलेकडे वळली. सुरवातीला छोट्या रांगोळ्या काढणाऱ्या शुभदा यांना कधी मोठ्या आकाराच्या रांगोळ्या साकारण्याचा आत्मविश्वास आला, हे त्यांनाही समजले नाही. कोरोना काळात त्यांनी रांगोळीचा अधिक सराव केला. विशेष म्हणजे, आजपर्यंत त्यांनी रांगोळी काढण्यासाठी कोणताही क्लास लावलेला नाही. मोबाइलच्या मदतीने विविध रांगोळ्या पाहून त्यातील बारकावे शिकत त्यांनी या कलेत प्रावीण्य मिळवले. प्रत्येक सणानिमित्त घराच्या दारासमोर त्या त्या सणाला अनुरूप रांगोळ्या काढण्यास त्यांनी सुरवात केली. पोळ्याला बैल, तर गुढीपाडव्याला गुढी आणि तोरण अशा विविध आकृत्यांतून त्यांच्या कलेचा प्रवास सुरू झाला. याच छोट्या रांगोळ्यांमधून आत्मविश्वास वाढत गेला आणि पुढे त्या सहजपणे १० बाय ६ फुटांच्या मोठ्या रांगोळ्या साकारू लागल्या. नवरात्रोत्सवात त्यांनी श्री महालक्ष्मी, रेणुका माता, सप्तशृंगी माता आणि महाकाली देवी यांची रांगोळी साकारली. यंदा श्री सरस्वती मातेची रांगोळी त्यांनी चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर पूर्ण केली. ही रांगोळी पाहण्यासाठी त्यांच्या घरी नागरिक येत असून, त्यांच्या कलेचे कौतुक होत आहे. देवींच्या विविध रूपांसोबतच गजानन महाराज, स्वामी समर्थ, दत्तगुरू, महादेव, विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, खंडोबा, छत्रपती शिवाजी महाराज, लता मंगेशकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा विविध व्यक्तिमत्त्वांची व देवतांची चित्रेही त्यांनी रांगोळीतून साकारली आहेत. ---- कला अंबामातेच्या चरणी अर्पण आपल्या कलेविषयी भावना व्यक्त करताना शुभदा देशमुख म्हणाल्या की, त्यांनी साकारलेली रांगोळी ही अंबामातेच्या चरणी अर्पण आहे. आपल्या हातून अशाच सुंदर रांगोळ्या साकारत राहाव्यात आणि देवीची ही सेवा अविरतपणे घडत राहावी, हीच त्यांची मनोकामना आहे. कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता, केवळ आवड, सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी साधलेली ही कलात्मक प्रगती निश्चितच प्रेरणादायी आहे, असे शुभदा देशमुख म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com