Sillod E-KYC Issue:तहसीलच्या पायऱ्यांवर ज्येष्ठांच हाल;अनुदानासाठी ताटकळण्याची वेळ; ‘ई-केवायसी’च्या नावाखाली प्रशासनाकडून हेळसांड

Sillod E-KYC Issue, Senior Citizens, Government Scheme Delay सिल्लोड तहसील कार्यालयात श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करताना ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Sillod E-KYC Issue, Senior Citizens, Government Scheme Delay

Sillod E-KYC Issue, Senior Citizens, Government Scheme Delay

esakal

Updated on: 

सिल्लोड, : उतारवयात जगण्याचा आधार ठरावा म्हणून शासनाने दिलेल्या तुटपुंज्या अनुदानासाठी वयोवृद्ध नागरिकांना सिल्लोड तहसील कार्यालयात अक्षरशः मरणयातना सोसाव्या लागत आहेत. विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक असलेली ‘ई-केवायसी’ करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना उन्हातान्हात तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. एकीकडे सर्व्हर बंद असल्याचे कारण सांगून त्यांना माघारी पाठवले जात असताना, दुसरीकडे चिरीमिरी दिल्यास याच बंद सर्व्हरवरून ई-केवायसी कशी होते? असा संतप्त सवाल ज्येष्ठांनी विचारला आहे.

श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार यांसारख्या योजनांमध्ये मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना लाभ सुरू होण्यापूर्वी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. यासाठी ग्रामीण भागातून अनेक वयोवृद्ध, आधार नसलेले आणि काठी टेकत चालणारे आजी-आजोबा सकाळीच तहसील कार्यालयात पोचतात. मात्र, संबंधित ऑनलाइन संकेतस्थळ सातत्याने बंद असल्याचे उत्तर देऊन त्यांची बोळवण केली जाते. मंजुरी पत्र हातात पडूनही मागील तीन महिन्यांपासून हक्काचे अनुदान मिळवण्यासाठी या वृद्धांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

मागील काही महिन्यांपासून राज्यात सुरळीत सुरू असलेली ही प्रक्रिया सिल्लोडमध्ये मात्र जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवली जात असल्याचा आरोप होत आहे. काही नागरिकांनी मध्यस्थांना पैसे दिल्यानंतर त्यांची ई-केवायसी तत्काळ होत असल्याचे उघडकीस आले. प्रशासनातील वरिष्ठांनी या प्रक्रियेतील त्रुटी दूर करून वृद्धांना दिलासा देणे अपेक्षित असताना, त्यांच्या डोळेझाक करण्याच्या वृत्तीमुळे निराधारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ई-केवायसीसाठी नेमका अडथळा कुठे?

योजनेचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक असली, तरी संकेतस्थळ खरोखरच बंद असते की जाणीवपूर्वक बंद पाडले जाते? याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. जर सर्व्हर डाऊन आहे, तर काही ठराविक लोकांची कामे कशी होतात? ऑनलाइन प्रक्रिया सुरळीत करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, तांत्रिक बिघाडाचा फटका केवळ सर्वसामान्य आणि गरिबांनाच का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने यामागील सत्य स्पष्ट करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी संतप्त लाभार्थी करीत आहेत.

ई-केवायसी प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तसेच वयोवृद्धांची हेळसांड होणार नाही, यासाठी तातडीने योग्य ते नियोजन करण्यात येईल.

- सागर वाघमारे, तहसीलदार, सिल्लोड

माझे नाव श्रावणबाळ योजनेत मंजूर झाले आहे. पण केवळ ई-केवायसीसाठी मी गेल्या एका महिन्यापासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहे. म्हातारपणी एवढी पायपीट करून आज कसेबसे माझे काम झाले.

- भगवान बोर्डे, लाभार्थी, धोत्रा

माझी फाइल मंजूर होऊन चार महिने उलटले. पण पगार सुरू करण्यासाठी मला सारख्या चकरा माराव्या लागत आहेत. आम्हाला असा किती त्रास देणार?

- कडुबाई करणाडे, लाभार्थी, सिसारखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com