गाळामुळे २५ बंधाऱ्यांच्या साठवण क्षमतेत घट
प्रशासनाने गाळ उपसा करण्यासाठी पुढाकार घेण्याची झरीकरांची मागणी
परभणी, ता. १३ ः झरी (ता.परभणी) गावातील लेंडी ओढ्यावर बांधण्यात आलेले २५ बंधारे गेल्या दहा वर्षांपासून गाळाने पूर्णतः भरले असून, त्यांची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांमधील गाळ तातडीने काढून बंधारे गाळमुक्त करावेत, अशी मागणी कांतराव देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
झरी हे जवळपास २२ हजार लोकसंख्या असलेले गाव असून, २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत या गावाची निवड करण्यात आली होती. त्यावेळी गावातील लेंडी ओढ्याचे जवळपास नऊ किलोमीटर लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. तसेच या ओढ्यावर तब्बल २५ बंधारे बांधण्यात आले होते. या कामामुळे गावासह परिसरातील पाणीपातळीत सुधारणा झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही. मात्र, या बंधाऱ्यांमधील गाळ काढण्यात न आल्याने सर्व २५ बंधारे गाळाने भरले आहेत. परिणामी, पावसाचे पाणी अडवून साठवण्याची क्षमता कमी झाली असून, जलसंधारणाच्या मूळ उद्देशालाच बाधा निर्माण झाली आहे. यंदा या बंधाऱ्यांमधील गाळ काढला नाही, तर भविष्यात २२ हजार लोकसंख्या असलेल्या झरी गावासह परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती कांतराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत झरी येथील लेंडी ओढ्यावरील सर्व २५ बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देऊन गाळ काढण्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गावाच्या भविष्यातील पाणीप्रश्नाचा विचार करून प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.