ABD26J82745 बीड : सराफा दुकानात विक्रीसाठी आलेली चांदीची मासोळी.
पान १ अँकर
---
हुपरीच्या कलाकुसरीची बीडमधील बाजारात मोठी क्रेझ
लक्ष्मीपूजनाला यंदा चांदीच्या मासोळीचा नवा ट्रेंड; सोने-चांदीच्या नाण्यांनाही मागणी
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ५ (बातमीदार) ः दिवाळी आणि सोने-चांदीची खरेदी हे एक अतूट समीकरण आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी परंपरेनुसार सोने आणि चांदीच्या नाण्यांचे पूजन घरोघरी केले जाते. मात्र, यंदा बीडच्या सराफा बाजारात एक वेगळाच आणि आकर्षक ट्रेंड पाहायला मिळत आहे. पूजनासाठी नाण्यांसोबतच यंदा चांदीच्या मासोळीला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.
उत्तर भारतात समृद्धी, भरभराट आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून चांदीच्या मासोळीची पूजा करण्याची मोठी परंपरा आहे. हीच समृद्धीची परंपरा आता बीडच्या बाजारपेठेतही हळूहळू रुजताना दिसत आहे. चांदीच्या अत्यंत नाजूक आणि सुबक कलाकुसरीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील कुशल कारागिरांनी हाताने घडवलेल्या या चांदीच्या मासोळ्या देशभरात आणि परदेशातही पाठवल्या जातात. यंदाच्या दिवाळीत याच हुपरीच्या मासोळ्यांनी बीडच्या सराफा बाजारात खास आकर्षण निर्माण केले आहे. ५ ग्रॅमपासून ते २५ ग्रॅम वजनापर्यंतच्या या आकर्षक मासोळ्या सध्या बाजारात उपलब्ध असून, खरेदीसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
----
पारंपरिक पसंती कायम
चांदीच्या मासोळीचा ट्रेंड नव्याने आला असला तरी, परंपरेनुसार सोने आणि चांदीच्या लक्ष्मी नाण्यांची खरेदीही जोरदार सुरू आहे. बाजारात १ ग्रॅमपासून ते १० ग्रॅम आणि अगदी १०० ग्रॅमपर्यंत वजनाची आकर्षक लक्ष्मीची नाणी उपलब्ध असून, ग्राहकांकडून त्यांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे.
----
नाणी आणि मासोळीचे दर
बाजारपेठेत पूजनासाठी ५ ग्रॅम चांदीची मासोळी साधारण १,००० रुपयांना, तर २५ ग्रॅमची मासोळी ५,००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. सोन्याच्या लक्ष्मी नाण्यांमध्ये १ ग्रॅमचे नाणे १४,५५० रुपये, तर १० ग्रॅमचे नाणे १,४५,००० रुपयांना विक्री होत आहे. तसेच १ ग्रॅम चांदीचे नाणे २०० रुपयांना, तर १० ग्रॅमचे नाणे २,००० रुपयांना मिळत आहे.
-----
कोट:
आपल्याकडे विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीच्या लक्ष्मी नाण्याचे पूजन करण्याची परंपरा आहे. मात्र, यावर्षी परंपरेसोबतच चांदीच्या मासोळीलाही ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. आम्ही ही खास मासोळी हुपरीवरून मागवली असून, या नव्या पर्यायाला ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- रवींद्र चव्हाण, न्यू साई ज्वेलर्स, बीड