ABD26J79514 सारखणी : रस्त्यावरील खड्ड्यात चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (छायाचित्र ः पंकज जयस्वाल)
---
‘जलजीवन’च्या कामानंतर सिंदखेडच्या रस्त्यांची दुरवस्था
----
खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त
----
सारखणी, ता. १६ (बातमीदार) : जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी सिंदखेड गावातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, चिखल आणि पाणी साचल्याने दुकानदार तसेच वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली असून, नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहे.
रस्त्याच्या कडेला पाणी साचून राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जलजीवन मिशनचे काम महत्त्वाचे असले, तरी कामानंतर रस्त्याची पूर्ववत दुरुस्ती करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, साचलेले पाणी काढावे तसेच डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी सिंदखेड येथील ग्रामस्थ, दुकानदार व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.