ग्रामपंचायतीमध्ये एकल महिलांची अधिकृत नोंदणी करा
विविध सामाजिक संस्थांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन
धाराशिव, ता. २० : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकल महिलांची अधिकृत व स्वतंत्र नोंदणी करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन कोरो इंडिया नेटवर्क आणि संलग्न संस्था-संघटनांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
समाजातील उपेक्षित आणि संघर्षाचा सामना करणाऱ्या एकल महिलांचे जीवन सुखकर व्हावे, त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि त्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा, या उद्देशाने संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांची भेट घेत महिलांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. निवेदनाचा स्वीकारत जिल्हाधिकारी पुजार यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी महिलांच्या पुनर्वसनासाठी विशेष धोरण राबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकल महिलांची अधिकृत व स्वतंत्र नोंदणी करावी, प्रत्येक ग्रामसभेच्या अजेंड्यावर एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व सुरक्षेच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे सविस्तर चर्चा घडवून आणावी, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी असलेली वार्षिक उत्पन्नाची अट वाढवून ती ५० हजार रुपये करण्यात यावी, एकल महिलांच्या पाल्यांना आधार देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक मानधनाच्या रकमेत भरीव वाढ करावी, दुष्काळी किंवा टंचाईच्या परिस्थितीत एकल महिलांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी कोरो इंडियाच्या लक्ष्मी वाघमारे, श्रध्दा बंडगर, शांतिसागर संस्थेचे रविकांत पायाळ, रुरल डेव्हलपमेंट सेंटरचे संजीव आगळे, शिवप्रताप संस्थेचे सुधाकर बुकन, ग्रामनिवारा फाउंडेशनचे सुनील कांबळे, वैशाली धावारे, अर्चना मस्के, शुभांगी व्हरकटे, अमृता रणदिवे, प्रमिला वडवले आणि भाग्यश्री कांदे आदी उपस्थित होते.
......
धाराशिव ः एकल महिलासंबंधीच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य.
फोटो क्रमांक ःOSM26B07248