औरंगाबाद : यकृत देऊन बहिणीचे भावाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर डॉ. हेमंत गढरी व दीपा पवार हे दोघे भाऊ व बहीण.

औरंगाबाद : यकृत देऊन बहिणीचे भावाला जीवदान

सोयगाव - भावाच्या मनगटावर राखीचा धागा बांधताना त्याच्या दीर्घायुष्याची मनोकामना करणारी आणि प्रत्यक्षातही भावाच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी एक बहीणच दाखवू शकते. मालेगावमधील अशाच एका ४४ वर्षीय बहिणीने आपल्यापेक्षा दोन वर्षे लहान असलेल्या भावास यकृत देऊन जीवदान दिले. बहिणीने भावाचा जीव वाचविल्याने भावाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. मालेगाव येथील वाडिया रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. हेमंत गढरी यांचा गेल्या दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे त्यांच्या एका पायाची शस्त्रक्रिया करावी लागली. या अपघातातील जखमांमधून सावरण्यासाठी झालेल्या गोळ्या व औषधांच्या अतिसेवनामुळे त्यांचे किडनी व यकृत निकामी झाले. त्यामुळे ते सतत आजारी पडत होते. डॉक्‍टरांनी त्यांना किडनी व यकृत निकामी झाल्याचे सांगितले. तुम्हाला दुसरी किडनी व यकृताचे प्रत्यारोपण करावे लागेल तरच तुमची जगण्याची शक्यता वाढू शकेल, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

हे सर्व लक्षात घेता डॉ. गढरी यांची बहीण दीपा पवार यांनी यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. चाचण्या केल्यानंतर मोठ्या बहिणीच्या यकृताचे प्रत्यारोपण करता येईल, असा निष्कर्ष निघाला. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मुंबईतील रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमधील डॉ. आकाश शुक्ला यांनी घेतला. आठ दिवसांपूर्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. जीवनमरणाच्या संकटात सापडलेल्या लहान भावाला स्वतःचे यकृत दान देऊन त्यांचा प्राण वाचविण्याची कामगिरी करणाऱ्या दीपा पवार यांचा निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

दोन वर्षांपूर्वी अपघातानंतर पायाची शस्त्रक्रिया करावी लागली. गोळ्यांच्या प्रतिक्रियांमुळे माझे यकृत व किडनी निकामी झाले. माझी मोठी बहीण दीपा हिने मला धीर देत मला स्वतःचे यकृत दिल्याने मी भरून पावलो व मला तिच्यामुळे जीवदान मिळाले. त्यात आमचे मेहुणे धीरज पवार यांचे पाठबळ महत्त्वाचे ठरले.

- डॉ. हेमंत गढरी, वैद्यकीय अधिकारी.

दोन वर्षांपूर्वी माझा लहान भाऊ हेमंत याचा अपघात झाला. त्यात त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. गोळ्या-औषधांच्या प्रतिक्रियांमुळे त्याची किडनी व यकृत निकामी झाले. त्यामुळे प्रत्यारोपणाशिवाय पर्याय उरला नाही. माझे यकृत देण्याचा निर्णय मी घेतला. त्यात माझे पती धीरज पवार यांची मला साथ मिळाली, त्यामुळे हे सर्व शक्य झाले.

- दीपा पवार, बहीण.

Web Title: Sister Donates Liver Gives Life To Brother

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top