अल्पभूधारक शेतकऱ्याचे घर
फायनान्स कंपनीकडून सील
---------------
लातूर, ता. १५ : कर्जाचे हप्ते थकल्याने तालुक्यातील ममदापूर येथील अल्पभूदारक शेतकरी नवनाथ बोयणे यांचे घर फायनान्स कंपनीकडून सील करण्यात आल्याची घटना समोर आली. घर सील केल्याने बोयणे कुटुंबाला घराबाहेर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या घटनेची प्रशासन दखल कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व अन्य कर्जदारांना दिलेल्या कर्जाची वसुली करताना स्मॉल फायनान्स, मायक्रो फायनान्स व इतर खासगी वित्तीय संस्थांनी कोणत्याही प्रकारची सक्ती करणे, कर्जवसुलीसाठी मानसिक त्रास देणे, अपमानास्पद वर्तन करणे, धमकी किंवा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नये. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी नुकत्याच दिल्या आहेत. राज्य सरकारनेही याबाबत वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. अशा स्थितीत ममदापूर येथील अल्पभूदारक शेतकरी बोयणे यांचे घर फायनान्स कंपनीकडून सील केल्याची घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी ही घटना घडली असली, तरी संबंधीत शेतकरी कुटुंबाला घराबाहेर रहावे लागत आहे.