
औरंगाबाद : एकाच महिन्यात २१ रस्त्यांची कामे - आस्तिककुमार पांडेय
औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरातील १०७ रस्त्यांची कामे करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. ही कामे मुदतीत म्हणजेच नऊ महिन्यात तर २१ रस्त्यांची कामे अवघ्या एका महिन्यात पूर्ण होतील, असे महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (ता. २०) सांगितले. स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे कामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी अधिकारी व कंत्राटदाराला दिले.
स्मार्ट सिटी अंतर्गत कामांचा शुक्रवारी श्री. पांडेय यांनी आढावा घेतला. अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा थेटे, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, स्मार्ट सिटीचे अधिकारी, कंत्राटदार उपस्थित होते. बैठकीत प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान यांनी सांगितले की, १०७ चा ड्रोन सर्वे झाला आहे. रस्त्यांची कामे निविदेतील अटीनुसार नऊ महिन्यांत पूर्ण होतील. छोट्या २१ रस्त्यांची कामे अवघ्या एका महिन्यात होतील.
सफारी पार्कच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामांची नकाशे तयार आहेत. सल्लागाराकडून पाहणी नंतर साइटच्या कामाला सुरुवात होईल. या कामाच्या गुणवत्तेची तपासणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय करणार आहे. सफारी पार्क परिसरातील पर्यायी रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. अन्य एका रस्त्यासाठी अधिग्रहणाचे काम शिल्लक आहे. त्यामुळे जागेचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करा, अशी सूचना श्री. पांडेय यांनी नगररचना उपसंचालक ए. बी. देशमुख यांना केली. स्मार्ट हेल्थ प्रकल्पांतर्गत तीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्यासाठी एन-२, एन-१२ व आंबेडकर नगर येथे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
गारखेडा शाळेत स्मार्ट स्कूलचा डेमो
स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या ५४ शाळांचा कायापालट केला जाणार आहे. हे कंत्राट विक्रम इन्फ्राला देण्यात आले आहे. एका शाळेच्या बांधकामासाठी पंधरा दिवस ते एक महिना लागणार आहे. गारखेडा येथील शाळेत स्मार्ट स्कूलचा आदर्श डेमो तयार केला जाईल, फर्निचरची तपासणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्याकडून केली जाईल, असे कंत्राटदारातर्फे सांगण्यात आले.
नकली ब्रॅण्डपासून सावधान..
संत तुकाराम नाट्यगृहाचे काम करताना खुर्च्या योग्य अंतरावर असाव्यात. विद्युतीकरणाच्या काम करताना नकली ब्रॅण्डचा वापर तर होत नाही याची काळजी घ्यावी, असे प्रशासकांनी सांगितले. जाधववाडी भागात बस डेपो तयार करण्यात येत आहे. यासाठी नियुक्त कंत्राटदार बी. बी. इन्फ्रातर्फे सांगण्यात आले की, सध्या जमीन लेव्हल करण्यात आली आहे. सोलींगचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होईल.
Web Title: Smart City 21 Road Works In One Month Astik Kumar Pandey Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..