आश्रमशाळांत सर्पदंश जनजागृती अभियान
-१९ ते २६ सप्टेंबरदरम्यान उपक्रम; सर्पमित्र, आरोग्य, वन विभाग तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १३ : डोंगराळ व वनक्षेत्रालगत असलेल्या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आदिवासी विकास विभागाकडून १९ ते २६ सप्टेंबर या कालावधीत ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’ राबविण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि वसतिगृहांमध्ये हा उपक्रम घेण्यात येईल.या अभियानात स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ, आरोग्य विभाग, वन विभागाच्या सहकार्याने किमान एक तासाचे जनजागृती सत्र घेतले जाणार आहे. साप आढळल्यास सुरक्षित अंतर ठेवणे, शांतपणे त्या ठिकाणापासून दूर जाणे, सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची काळजी तसेच अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. सर्पदंश झाल्यास बाधित व्यक्तीची हालचाल कमी ठेवून तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. तसेच सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये, असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात येणार आहे. राज्य शासनाने १८ ऑगस्ट सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांची वेळेत नोंद करणे, त्यावर लक्ष ठेवणे आणि सापाच्या विषावरील प्रतिविष उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्थांची माहिती अद्ययावत ठेवण्यावर विभागाने भर दिला आहे.
((चौकट)))
तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रेही होणार
आदिवासी विकास विभागाच्या डिजिटल स्टुडिओच्या माध्यमातूनही सर्पदंश प्रतिबंध आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद याबाबत तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे घेण्यात येणार आहेत. जनजागृतीदरम्यान शाळेच्या परिसरात जिवंत साप आणून प्रात्यक्षिक करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
((चौकट))
तीन महिन्यांनी माहिती अद्ययावत
आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, वसतीगृह अधीक्षक, परिचारिकांना आपत्कालीन संपर्काची माहिती दर तीन महिन्यांनी अद्ययावत करावी लागणार आहे. यात जवळच्या आरोग्य संस्थेचा संपर्क क्रमांक, प्रतिविष उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्थेची माहिती, आपत्कालीन वाहतूक व्यवस्था, स्थानिक सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक यांचा समावेश असेल. आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे अभियान महत्त्वाचे ठरणार असल्याचे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त (प्र.) गोपीचंद कदम यांनी सांगितले.