चऱ्हाटा आरोग्य केंद्राचा सौरऊर्जा प्रकल्प रखडला
बीड ः चऱ्हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी नसताना एक लाखाचे वीज बिल आले आहे. थकीत बिल भरल्याशिवाय सौरऊर्जा प्रकल्प सुरू न करण्याच्या महावितरणच्या भूमिकेमुळे हा प्रकल्प रखडला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला. या प्रश्नावर २१ ऑक्टोबरला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनूस चऱ्हाटकर यांनी ग्रामस्थांसह दिला होता. डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांची भेट घेतली. डॉ. गंडाळ यांनी आठवडाभरात महावितरणशी पत्रव्यवहार करून प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केल्याची माहिती शेख युनूस चऱ्हाटकर यांनी दिली. यावेळी सरफराज पठाण उपस्थित होते.
-----
शिरूर कासार तालुक्यात चारा छावण्यांची नितांत गरज
शिरूर कासार ः तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पाण्याअभावी जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पशुपालकांना जनावरे जगवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने दुष्काळात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु अद्यापही अंमलबजावणीला सुरुवात झाली नाही. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यापासूनच यंदा उन्हाळ्यातील उष्णतेच्या झळा लागत आहेत. यामुळे पशुधन सांभाळणे आगामी काळात कठीण होणार आहे. यासाठी पशुपालकांना आधार देण्यासाठी शासनाने तातडीने चाराछावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी पशुपालकांकडून करण्यात येत आहे.
-----
धारूरमध्ये विद्यार्थ्यांचे बालहक्क प्रबोधन
किल्ले धारूर ः विद्यार्थ्यांचे बालपण सुरक्षित असावे, त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, असे प्रतिपादन न्यायाधीश एन. एम. वाली यांनी केले. ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय, किल्लेधारूर येथे विधी सेवा समिती व वकील संघातर्फे सुरक्षित बचपन अभियान अंतर्गत शिबिर झाले. न्यायाधीश एन. एम. वाली यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय कोकणे, केंद्रप्रमुख सुदर्शन काळे, ॲड. पी. पी. शिनगारे, ॲड. मोहन भोसले प्रमुख पाहुणे होते. यावेळी ॲड. एम. डी. नखाते, ॲड. मोहन भोसले, ॲड. सी. बी. हंगे यांनी बालहक्क व कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ॲड. पी. पी. शिनगारे, सूत्रसंचालन सचिन चव्हाण यांनी केले, तर अशोक अंडिल यांनी आभार मानले.
-----
सद्गुरू बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
शिरूर कासार ः तालुक्यातील आर्वी येथील श्री सद्गुरू बाळूमामा देवालयात शुक्रवार, (ता. २४) रोजी सद्गुरू बाळूमामा जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम ठेवले आहेत. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजता कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत नारायण महाराज भोसले यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिक विचारांचे श्रवण करता येणार आहे. रात्री ८ वाजता महाप्रसाद होणार आहे. प्रकाश सोनाजी फपाळ व समस्त फपाळ परिवार यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे.
-----
विद्यार्थिनीने रेखाटलेल्या देवीच्या चित्राला दाद
बीड ः येथील चंपावती विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या शर्वरी संजय टेपाळे हिने दुर्गादेवीचे सुंदर चित्र रेखाटले आहे. बालपणापासून तिला चित्रकलेची आवड निर्माण झाली. महाराष्ट्र रेखाकला मंडळाच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षा ती उत्तीर्ण आहे. गणेशोत्सवात गणपती, नवरात्रीमध्ये देवी तसेच अनेक देवी, देवतांचे हुबेहूब चित्र हिने रेखाटले असून तिच्या या कलाकृतीमुळे तिच्यातील सुप्त कलागुणांना सुंदर अभिव्यक्ती मिळाली आहे. तिच्या कलात्मक कौशल्याचे व कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
------
चैतन्य घवटेची गोळा आणि थाळीफेकमध्ये भरारी
केज ः तालुक्यातील धारूर (आ.) येथील पुरुषोत्तमराव सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चैतन्य माधव घवटे याने विभागीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम पटकावून सुवर्णपदक तर थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक मिळविले. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. परभणी येथे विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२६ - २७ आयोजित करण्यात आल्या होत्या. चैतन्य घवटे याने विभागीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम पटकावून सुवर्णपदक मिळविले, तर थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक मिळविले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनवणे, माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-----
धारूरमध्ये कन्यापूजनाचा स्तुत्य उपक्रम
किल्ले धारूर ः शहरातील प्रतिभानगर येथे कन्यापूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. राम शिनगारे व त्यांच्या पत्नी शुभांगी शिनगारे यांच्या पुढाकारातून कन्यांना एकत्र करून त्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी वर्षा शिनगारे, निशा शिनगारे उपस्थित होत्या. या उपक्रमातून कन्यांचा सन्मान आणि स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा संदेश देण्यात आला. भारतीय संस्कृतीमध्ये कन्येला देवीचे रूप मानले जाते. नवरात्रोत्सवात कन्यापूजनाला विशेष महत्त्व असून, या परंपरेतून मुलींचा आदर, सन्मान आणि त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा व्यक्त केली जाते. याच भावनेतून प्रतिभानगर येथे कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुलींचा सन्मान करणे आणि समाजात स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. डॉ. राम शिनगारे व शुभांगी शिनगारे यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
------
डांबीच्या जि.प. शाळेत विद्यार्थिनींचा नवदुर्गा सन्मान
बीड ः नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून डांबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींसाठी नवदुर्गा सन्मान व कन्यापूजन उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव करणे व आत्मविश्वास वाढवणे हा यामागचा उद्देश होता. प्रत्येक वर्गातून शैक्षणिक प्रगती व उपक्रमांतील सहभागाच्या आधारे एका विद्यार्थिनीची नवदुर्गा म्हणून निवड करून त्यांना शैक्षणिक साहित्य व विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी बालनाट्यातून अंधश्रद्धा, व्यसनाधीनता व जातिभेद यांसारख्या समस्यांवर प्रबोधन केले. आदर्श शिक्षिका स्वप्नाली गुरले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. यासाठी मुख्याध्यापक फड, जातकर, नेहरकर, दहीवाडे, आंधळे व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. यावेळी सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
--------
गरजू विद्यार्थिनींना सायकली व शैक्षणिक साहित्याचे वाटप
बीड ः मंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त जयकुमार गोरे वैद्यकीय मदत कक्ष (बीड विभाग) तर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. याअंतर्गत काचरवाडीत गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप व रक्तदान शिबिर झाले. तसेच कोरडेवाडी येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले. ग्रामीण विद्यार्थिनींची गैरसोय दूर व्हावी व शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे हा यामागील उद्देश होता. वैद्यकीय मदत कक्षाचे बीड विभागप्रमुख स्वप्निल वरपे यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी गावातील तरुण मंडळी, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व मदत कक्षाची टीम उपस्थित होती. सायकली व साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
----