esakal | ..‘त्यांनी’ थांबवलं, थोडी भीती वाटली!
sakal

बोलून बातमी शोधा

..‘त्यांनी’ थांबवलं, थोडी भीती वाटली!

..‘त्यांनी’ थांबवलं, थोडी भीती वाटली!

sakal_logo
By
अतुल पाटील : सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : रायपूर-बस्तर-दंतेवाडादरम्यान सोलो सायकलिंग करताना ‘केसकाल’ याठिकाणी अचानक १२-१३ लोक समोर आले. त्यांनी थांबवून विचारले, ‘‘कहासे आये हो, आधार कार्ड दिखाओ,’’ त्याक्षणी थोडी भीती वाटली, मात्र ते कोण आहेत? हे जाणून घेण्याच्या फंदात न पडता, त्यांच्या प्रश्‍नाची उत्तरे देत पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो. असा थरारक अनुभव औरंगाबादमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर पवार यांनी ‘सकाळ’कडे शेअर केला.

नक्षली भागातील समाजजीवन अनुभवावे, यासाठी सुधाकर पवार यांनी २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान, रायपूर ते दंतेवाडा असे ४०० किलोमीटरचे सोलो सायकलिंग पूर्ण केले. शिवाजीनगरच्या डॉ. पद्मसिंह पाटील प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक असलेले पवार यांनी संपूर्ण प्रवास उलगडताना तेथील समाजजीवनाविषयीही मत मांडले आहे. पवार म्हणाले, २६ सप्टेंबरला औरंगाबादेतून खासगी बसमधून निघालो, दुसऱ्या दिवशी दुपारी अडीचला रायपूर (छत्तीसगड) येथे पोचलो. तेथून तासाभरात सायकल प्रवासाला सुरवात केली. गाव आल्याशिवाय थांबता येत नाही, म्हणून रात्री आठपर्यंत ८०-९० किलोमीटरचा प्रवास केला. ‘धमतरी’ गावातील मुक्कामानंतर १५० किलोमीटरचा प्रवास करत ‘कोंडागाव’ गाठले. तिथून पुन्हा १४० किलोमीटरचा प्रवास करत दंतेवाडामध्ये पोचलो. तिथे तीन तास मिळाले, त्या दरम्यान दंतेश्‍वरी मंदिर, बाजार फिरता आला. त्यानंतर सायकल प्रवास थांबवून खासगी बसने प्रवास करीत त्याच रात्री बस्तरचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या जगदलपूरला मुक्काम केला. त्यानंतर रायपूर गाठून औरंगाबादला परतलो.

चारशे किलोमीटरच्या प्रवासात १२५ किलोमीटरचा भाग जंगलातून आहे. माणसांपेक्षा जनावरांचीच अधिक भीती होती, इतके घनदाट जंगल होते. केसकालनंतर दंतेवाडात प्रवेश करतानाही चार-पाच लोकांनी अडवत विचारपूस केली. कुठल्या भागातून जातोय, याची कल्पना असतानाही नंतर फारशी भीती वाटली नाही. सामान्य लोकांसाठी या भागात धोका नाही, याची खात्री पटली होती. चारशे किलोमीटरच्या प्रवासात रस्त्‍यावर जी गावे दिसली, त्याठिकाणी काही वेळ आतील गल्ल्यांमध्येही प्रवास केला. लोकांना बोललो. तेथील शासकीय विद्यालयात भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तिथल्या खेड्यापाड्यात गुगल पे पोचले पण. आजही राष्ट्रीय महामार्गाशेजारील गावातील लोकांना अर्ध्या कपड्यात राहावे लागतेय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महिलांना पायाचे आजार

भातशेती हेच पीक. तसेच जंगलातील सीताफळे विकणाऱ्या महिला रस्त्याकडेला बसल्या होत्या. पाहिल्यावर, बोलल्यावर त्यांना पायाचे आजार आहेत. यामुळेच बऱ्याच महिला लंगडत चालत होत्या.

फोटो काढताना हटकले..

सायकल प्रवासातील मुख्य रस्त्यावर मोबाइलचा वापर मॅप पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यापुरताच केला. दंतेवाडा येथे रेल्वेस्थानकात फोटो काढताना पोलिसांनी अटकाव केला. त्यांना महाराष्ट्रीयन सायकलिस्ट असल्याचे सांगितल्यानंतर मार्ग विचारल्यानंतर तोही सांगितल्यानंतर फोटो काढून दिला.

घरी सांगितले उशिरानेच…

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये पवार यांनी चंद्रपूर-गडचिरोली प्रवास केला. त्यावेळी घरच्यांना सांगितले. यावेळी मात्र, वर्धा-नागपूर सांगून रायपूरला पोचलो. तिथे पोचल्यावर रायपूर-दंतेवाडा सोलो सायकलिंग करत असल्याचे सांगितले. तेव्हा थोडे काळजीत पडले होते. मात्र, त्यांच्याशी रोज बोलणे होत असल्याने घरचे निर्धास्त झाले होते.

पवार यांना असेही छंद..

सुधाकर पवार यांना हॉर्स रायडिंगचाही छंद आहे. वॉटरकप स्पर्धेच्या वेळी त्यांच्या कोल्ही (ता. वैजापूर) गावी अभिनेता अमीर खान आणि किरण राव आले त्यावेळी सोबत हॉर्स रायडिंगही केले होते. त्यासोबत साप पकडणे, पॅराग्लायडिंग याबाबतचे तंत्रही शिकून घेतले आहे. सायकलिंगला २०१७ मध्ये सुरवात करून औरंगाबादहून खांडवा, पुणे, मुंबई, नाशिक, भीमाशंकर असे मार्ग पूर्ण केले आहेत.

loading image
go to top