Sambhaji Nagar News : जावयाने सासऱ्याची कापली दोन बोटे| Son-in-law cut two fingers of father-in-law Attempting over wife car | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Sambhaji Nagar News : जावयाने सासऱ्याची कापली दोन बोटे!

छत्रपती संभाजीनगर : अदालत रस्त्याजवळील कौटुंबिक न्यायालयात सुरु असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणात तारखेसाठी आलेल्या जावयाने सासरा आणि पत्नीच्या अंगावर कार घालून चिरडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तो फसल्याने सासरा कारच्या मागे धावला. त्यांनी हात खिडकीतून आत घातला असता जावयाने आतून धारदार वस्तूने त्यांची बोटे कापली, या घटनेत बोटाचे झालेले दोन तुकडे अक्षरशः रस्त्यावरुन उचलून आणण्यात आले, ही घटना १८ मार्चच्या दुपारी अडीच वाजता अदालत रस्त्यावरील सिग्नलवर घडली.

या प्रकरणी आरोपी जावयाविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.२१) गुन्हा दाखल करण्यात आला असून अजहर खान अफजल खान पठाण असे त्या आरोपी जावयाचे नाव आहे, तर काजी अब्दुल वाजीद अब्दुल (६२, रा. प्रतापनगर, उस्मानपूरा) असे जखमी सासऱ्याचे नाव आहे.

काजी यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलीचा विवाह काही महिन्यांपूर्वी आरोपी अजहर खान याच्यासोबत विवाह झालेला आहे. त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद होत असल्याने हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या तारखा सुरू आहेत.

सिग्नल लागल्याने कार थांबवावी लागली, अन्

१८ मार्चला काजी अब्दुल वाजीद हे मुलीला घेऊन न्यायालयात गेले होते. जावई अजहर खानदेखील तेथे आला होता. न्यायालयातील तारखेबाबत त्याला राग आल्यामुळे बाहेर येताच त्याने कोर्ट परिसरातच त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. तत्काळ बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर आरोपीने खिडकीतून धक्का देऊन कारसह पळ काढला.

काजी अब्दुल वाजीद यांनी त्याचा पाठलाग केला. जिल्हा न्यायालयासमोरील सिग्नलवर त्याला कार थांबवावी लागली. तेव्हा काजी अब्दुल वाजीद यांनी खिडकीतून हात घालून त्याला पकडले. त्याचवेळी अजहर खानने धारदार वस्तूने त्यांची बोटे चिरली. त्यात एका बोटाचे दोन तुकडे झाले. अतिरक्तस्राव होऊन काजी अब्दुल वाजीद हे बेशुद्ध झाले होते.

त्यांच्यावर घाटीत दाखल करण्यात आले, अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.