सोनपेठच्या शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा

सोनपेठच्या शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा
Published on
सोनपेठचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार मुदगल बंधाऱ्यातून १.२७०७ दलघमी पाणी हक्क मंजूर ----- सोनपेठ, ता. ८ (बातमीदार) : शहराच्या भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सोनपेठ नगर परिषदेस मुदगल बंधाऱ्यातून पिण्याच्या पाण्यासाठी १.२७०७ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी हक्क मंजूर करण्यात आला आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या या आदेशामुळे सोनपेठ शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र अष्टपुत्रे यांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत कार्यालयीन आदेश काढला. त्यानुसार मुदगल बंधाऱ्यातून सोनपेठ नगर परिषदेस पिण्याच्या पाण्यासाठी पाणी हक्क मंजूर करण्यात आला आहे. ----- २०५६ ची लोकसंख्या गृहीत सोनपेठ शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन हे पाणी आरक्षण करण्यात आले आहे. २०५६ ची अपेक्षित लोकसंख्या तसेच दरडोई १३५ लिटर पाणी वापराचे निकष विचारात घेण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात शहराला नियमित व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ----- तीन वर्षांपासून पाठपुरावा सोनपेठ शहरासाठी पाणी आरक्षण मिळावे, यासाठी आमदार राजेश विटेकर यांनी तीन वर्षांपासून जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही त्यांनी यासंदर्भात मागणी केली होती. अखेर पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाच्या संबंधित यंत्रणेकडून पाणी हक्क मंजूर करण्यात आला. ----- पाणी वापरावर अटी महामंडळाच्या आदेशानुसार पाणी हक्क मंजूर करताना जलसंपदा विभागाच्या नियमांनुसार विविध अटी घालण्यात आल्या आहेत. पाण्याची प्रत्यक्ष उपलब्धता जलाशयातील पाणीसाठा, शासनाने निश्चित केलेले निकष आणि संबंधित वर्षातील पाणीवाटप यावर अवलंबून राहणार आहे. तसेच पाणी वापराचे मोजमाप करण्यासाठी वॉटर मीटर व्यवस्था बंधनकारक करण्यात येणार आहे. ----- सोनपेठकरांना दिलासा भविष्यात भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मुदगल बंधाऱ्यातून पाणी आरक्षित झाल्याने शहराच्या वाढत्या लोकसंख्येला भविष्यात पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आधार मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com