रेल्वेच्या वेळेनुसार बससेवा सुरू करा
--------------------------------
गैरसोय टाळण्यासाठी सोनपेठमधील प्रवाशांची मागणी
सोनपेठ, ता.१० (बातमीदार) : शहरातून बीड, परभणी व परळी रेल्वेस्थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पुणे, मुंबई, हैदराबादसह विविध शहरांकडे जाण्यासाठी रेल्वेचा आधार घेणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेच्या वेळापत्रकानुसार बससेवा सुरू करावी, अशी मागणी शहरातील प्रवाशांनी केली आहे.
सोनपेठ येथून नुकतीच बीड व परभणी बससेवा सुरू करण्यात आली. या बससेवेचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांत मोठी चढाओढ पाहायला मिळाली. मात्र, बससेवा सुरू झाल्यानंतर तिच्या वेळेचे नियोजन प्रवाशांच्या गरजेनुसार होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. याबाबत प्रवाशांनी सांगितले की, परभणी रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी व नंदीग्राम एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार सोनपेठ-परभणी बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. परळी रेल्वेस्थानकावरून हैदराबादकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेच्या वेळेनुसार सोनपेठ-परळी बससेवेचे नियोजन करावे, अशीही मागणी आहे.
(((चौकट)))
बीड-सोनपेठ बस सुरु करा
नव्याने सुरु झालेल्या बीड रेल्वेस्थानकावरून पुण्याकडे जाणाऱ्या व पुण्याहून येणाऱ्या रेल्वेच्या वेळेशी सुसंगत सोनपेठ-बीड बससेवा उपलब्ध करावी यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना वेळेत रेल्वेस्थानकावर पोचता येईल. परतीच्या प्रवासातही बसची सुविधा मिळू शकेल.याशिवाय सोनपेठ ते नांदेड-पुर्णा मार्गे सकाळी जाणारी, रात्री सोनपेठला परतणारी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणीही प्रवाशांनी केली आहे.
((चौकट)))
विद्यार्थी, नोकरदारांची अपेक्षा
बससेवा सुरु करताना रेल्वेच्या वेळांशी सुसंगत वेळापत्रक केल्यास तालुक्यातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण व सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांच्या मागणीचा विचार करून रेल्वेच्या वेळापत्रकानुसार बससेवेचे नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------