शेंगा लागण्यापूर्वीच सोयाबीनवर निसर्गाची अवकृपा
---
गोकुंदा, ता. १९ :किनवट तालुक्यातील मंगाबोडी, गोकुंदा, बोधडी, इस्लापूरसह विविध भागांत सोयाबीनची पिके पिवळी पडून करपण्यास सुरवात झाली आहे. काही शेतांमध्ये शेंगा लागल्या असल्या तरी त्यात दाणे भरले नाहीत, तर काही ठिकाणी सोयाबीनची झाडे वाढली असली तरी शेंगाच लागलेल्या नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे यंदाचे सोयाबीन उत्पादन हाती आले नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
हंगामाच्या सुरवातीला पावसाने चांगली साथ दिल्याने सोयाबीनचे पीक जोमाने आले होते. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पिकाच्या वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम पिकावर दिसून येत आहे. बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी केलेला खर्च लक्षात घेता हातातोंडाशी आलेले पीक पदरात पडणार नसल्याने शेतकऱ्यांसमोर विविध प्रश्न उभा राहिले आहेत. दरम्यान, कृषी विभागाने तालुक्यातील सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईबाबत कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
---
(((कोट))
सुरवातीला सोयाबीनचे पीक चांगले होते. त्यामुळे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता काही ठिकाणी पीक पिवळे पडून करपत आहे. कुठे शेंगा आहेत; पण दाणे भरलेले नाहीत, तर काही ठिकाणी झाडाला शेंगाच नाहीत. शेतकऱ्यांनी एवढा खर्च करून पीक उभे केले; मात्र निसर्गाच्या या संकटामुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
-नवीन गालेवार, शेतकरी.