पिके करपली; कापणी प्रयोग मात्र पाणी दिलेल्या शेतात!
बांगरवाडीतील शेतकऱ्यांचा आक्षेप; सोयाबीनच्या फेरकापणीची मागणी
कळंब, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यातील बांगरवाडी येथे महसूल, कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शनिवारी (ता. तीन) घेण्यात आलेला सोयाबीनचा कापणी प्रयोग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पावसातील मोठ्या खंडामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनात घट झाली असताना कापणी प्रयोगासाठी तीनवेळा पाणी दिलेला प्लॉट निवडण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे हा प्रयोग रद्द करून वस्तुस्थितीच्या आधारे फेरकापणी प्रयोग घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बांगरवाडी, दुधाळवाडी परिसरात यंदा पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. अनेक शेतांमध्ये शेंगा भरण्यापूर्वीच पिकाची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी उभे पीक करपून गेले. अशा परिस्थितीत बांगरवाडी येथील रामा सानप यांच्या शेतातील प्लॉट कापणी प्रयोगासाठी निवडण्यात आला. या प्लॉटला तीनवेळा पाणी देण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणी प्रतिगुंठा सुमारे सहा किलो सोयाबीन उत्पादनाची नोंद झाली; मात्र, हा प्लॉट परिसरातील सर्वसाधारण पीक परिस्थितीचे प्रतिनिधित्व करणारा नसल्याने त्यातून उत्पादनाची चुकीची सरासरी निघण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम पीकविमा नुकसानभरपाईवर होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी कापणी प्रयोग महत्त्वाचा असल्याने प्लॉटची निवड परिसरातील सर्वसाधारण पीक परिस्थिती लक्षात घेऊन होणे अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पिके जळाली, प्रयोग मात्र पाण्यावरच्या शेतात, अशी संतप्त प्रतिक्रिया अमोल लाटे यांच्यासह शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
.....................
((कोट))
पीक कापणी प्रयोग ही महसूल व कृषी विभागामार्फत रॅडम पद्धतीने प्रत्यक्ष हेक्टरी उत्पादन निश्चित करण्याची शासकीय प्रक्रिया आहे. प्लॉटची निवड आमच्या हातात नसून, ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे गटनंबर निवडला जातो. त्यानुसार शासनाच्या नियमानुसार प्रयोग घेण्यात आला.
- साधना गायकवाड, तलाठी, येरमाळा