‘भरमसाठ सोयाबीन काड,
पण हाती दाणं एक-दोन कट्टं’
---------
काढणी-भरडणीचा खर्च परवडेना; मशीनचालकांनी दर वाढवले, हार्वेस्टरला पसंती
-----
अविनाश पोफळे ः सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ३ : जिल्ह्यात सध्या सोयाबीन काढणी आणि भरडणीच्या कामांना वेग आला आहे. परंतु, यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीनचे पीक अपेक्षित आलेले नाही. शेतात काड भरमसाठ वाढले आहे, मात्र त्या तुलनेत सोयाबीन कट्टाभरच निघत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादनात मोठी घट झालेली असतानाच दुसरीकडे काढणी आणि भरडणीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे हाती आलेले कट्टा दोन कट्टे सोयाबीन विकून त्याचे आलेले पैसे काढणी आणि भरडणीसाठी द्यावे लागत आहेत. उरलेलं फक्त सोयाबीनचं भुस्कट शेतकऱ्यांच्या हाती लागत असल्याची विदारक स्थिती आहे.
------
हार्वेस्टरसाठी एकरी ३ हजारांचा दर
सोयाबीनची काढणी वेळेवर झाली नाही, तर शेंगा तडकून दाणे शेतातच गळून पडण्याची दाट भीती असते. त्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे सोयाबीन तडकून दाणे शेतातच मातील मिसळून चालले आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी हार्वेस्टरच्या साह्याने काढणी करण्याला पसंती देत आहेत. सध्या हार्वेस्टरने काढणी करण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी तब्बल ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. हा खर्च परवडणारा नसला, तरी वेळ वाचत असल्याने आणि नुकसान टाळण्यासाठी शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत आहेत. त्यामुळे दरवर्षी शिवारात घुमणारा भरडणी मशीनचा आवाज यंदा कमी झाला असून हार्वेस्टरचाच दबदबा पाहायला मिळत आहे.
-----
भरडणी दरात तब्बल १०० ते १५० रुपयांची वाढ
सोयाबीनच्या काडाच्या गंजी दिसायला प्रचंड मोठ्या दिसत असल्या, तरी त्यातून अवघे २ ते ४ कट्टेच (पोती) सोयाबीन हाती येत आहे. काड जास्त वेळ भरडावे लागत असल्याने डिझेलचा वापर वाढला आहे, तसेच मजुरीचा खर्चही सुटेनासा झाला आहे. त्यामुळे अनेक मशीनमालकांनी मशीन सुरूच केलेल्या नाहीत, तर ज्यांनी काम सुरू ठेवले आहे, त्यांनी प्रतिकट्टा १५० रुपयांऐवजी २५० ते ३०० रुपये दर घेण्यास सुरवात केली आहे.
------
((कोट))
दुष्काळ पडला आणि पीक करपलं. वटाण्यासारखं दाणं भरायला हवं होतं, ते ज्वारीसारखं बारीक भरलं. त्यामुळं उतारच पडला नाही. दोन एकर सोयाबीन होतं, त्यात फक्त १० कट्टं (५ क्विंटल) सोयाबीन झालं. सोयाबीन भरडणीला एका कट्ट्याला २५० रुपये आणि काढणीला एका एकराला साडेचार हजार रुपये खर्च आला. सोयाबीन विकून हाती आलेल्या पैशातून केवळ काढणी अन् भरडणीचाच खर्च निघेल. आमच्या हाती तर फक्त भुस्कट राहिलंय बघा.
- ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, आंबेजवळगे, ता. धाराशिव
-----
((कोट))
शेतात नुसतं काडच जास्त आहे. तासनतास मशीन चालवूनही दोन-चार कट्टेच सोयाबीन निघते. यापूर्वी कधी असा प्रकार झाला नव्हता. काड जास्तवेळ टाकावे लागत असल्यामुळे मशिनीसोबत काम करणारे मजूर कट्ट्यामागे ३० रुपयांऐवजी ६० रुपये मागतात. वाढलेले डिझेलचे दर आणि मजुरी यामुळे जुन्या १५० रुपये दरात काम करणे शक्यच नाही. धंदा बंद ठेवलेला परवडला, पण दीडशे रुपयात परवडत नाही.
- शहाजी जाधव, सोयाबीन भरडणी, मशीनमालक
-----
धाराशिव ः आंबेजवळगे येथील शेतकरी ज्ञानेश्वर जाधव यांच्या शेतात मशीनद्वारे सुरू असलेली सोयाबीनची भरडणी.
फोटो क्रमांक ः OSM26B07120