सणासुदीच्या तोंडावर सोयाबीन दरात तेजी

सणासुदीच्या तोंडावर  सोयाबीन दरात तेजी
Published on: 
सणासुदीच्या तोंडावर सोयाबीनच्या दरात तेजी शेतकऱ्यांना दिलासा, क्विंटलमागे १२०० रुपयांची वाढ सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १५ : अत्यंत कमी आणि अनियमित पावसामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन घटून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, जे काही उत्पादन हाती आले आहे, त्याला सध्या बाजारात चांगला भाव मिळत आहे. बाजारातील सोयाबीनची आवक कमी आणि मागणी प्रचंड असल्याने दरात रोज वाढ होत आहे. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत सोयाबीनच्या दरात १ हजार २०० रुपयांपर्यंतची वाढ नोंदवली गेली. गुरुवारी येथील बाजारपेठेत दर्जेदार सोयाबीनला कमाल ७ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. शासनाच्या ५ हजार ७०८ रुपयांच्या हमीभावापेक्षा हा दर सुमारे १४०० रुपयांनी अधिक असल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर बळिराजाला दिलासा मिळाला आहे. ....... मागील महिन्याच्या तुलनेत चित्र पालटले मागील महिन्यापर्यंत विविध बाजार समित्या व ऑइल मिल्सच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन ५ हजार ७०० ते ५ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान ट्रेड करत होते. मात्र, दुष्काळी स्थितीमुळे पिके वाया गेल्याने उत्पादनात मोठी घट येत आहे. यंदा हाती येणाऱ्या सोयाबीनचा दर्जा मागील वर्षीपेक्षा अधिक चांगला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या वाळलेल्या मालाला मागणी वाढल्याने अवघ्या दोन आठवड्यांत दरांमध्ये क्विंटलमागे थेट १,२०० रुपयांची मोठी भर पडली आहे. ........... मागणी जास्त, उत्पादनात घसरण यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. एरवी एकरी सात ते आठ क्विंटल हाती येणारे उत्पादन यंदा थेट एक ते दीड क्विंटलपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे बाजारात आवक खूपच कमी आहे. त्यातच ज्या शेतकऱ्यांकडे सध्या माल उपलब्ध आहे, त्यांनीही भविष्यात आणखी दरवाढ मिळेल या अपेक्षेने सोयाबीन विक्रीसाठी बाहेर काढलेले नाही. आवक रोखली गेल्यामुळे तुटवडा अधिकच तीव्र झाला आहे. ....... मागणी २३ हजार टन; आवक अवघी ५ हजार टन मराठवाड्यातील प्रक्रिया उद्योगांची (ऑइल मिल्स) स्थिती पाहता, एकट्या बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात मिळून सुमारे २३ ऑइल मिल्स आहेत. या सर्व मिल्स मिळून रोजची क्रशिंग क्षमता २३ हजार टन इतकी आहे. म्हणजेच क्रशिंग प्लांट्स सुरळीत चालवण्यासाठी दररोज किमान २३ हजार टन सोयाबीनची आवश्यकता आहे. पण, प्रत्यक्षात त्यांना रोज अवघी ५ हजार टनांची आवक होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक पाव पटही नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये माल खरेदीसाठी चुरस निर्माण झाली असून दरात सातत्याने वाढ होत आहे. ....... ((कोट)) दरवर्षी ७० क्विंटल सोयाबीन होते. यंदा तीस क्विंटल उत्पादन मिळाले. आज ते धाराशिव येथे विकले. त्यास ७ हजार ५० रुपये क्विंटलचा दर मिळाला. चांगला दर मिळाल्यामुळे सणासुदीच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे. - राजकुमार खैरे, मसला खुर्द (ता. तुळजापूर) ....... ((कोट)) सोयाबीनचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे झालेले मूळ नुकसान पूर्णपणे भरून निघणारे नसले, तरी सध्या मिळणारा ७ हजार १०० रुपयांचा दर सणासुदीच्या काळात शेतकरी कुटुंबांना मोठा आधार देणारा ठरत आहे. - दत्तात्रेय कागदे, सोयाबीन खरेदीदार, दहिफळ (ता. कळंब) ........ ((कोट)) मराठवाड्यातील २३ मिल्सची दिवसाची क्रशिंग क्षमता २३ हजार टन आहे. तितक्या सोयाबीनची बाजारात मागणी आहे. मात्र, प्रत्यक्ष आवक रोज अवघ्या ५ हजार टन होत आहे. थोडक्यात मागणी प्रचंड आणि पुरवठा अतिशय कमी अशी स्थिती निर्माण झाल्यानेच दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. - प्रवीण शेळके, संचालक, डेक्कन फार्मर्स उद्योग समूह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com