सोयाबिन गुळीची जमवाजमव

सोयाबिन गुळीची जमवाजमव
Published on: 
चारा टंचाईच्या धास्तीने सोयाबीनच्या गुळीची साठवणूक जळकोट, ता. २५ (बातमीदार) : भविष्यात चारा कमी पडू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच सोयाबीनच्या गुळीची साठवणूक करण्यावर भर दिला आहे. सोयाबीनची काढणी हार्वेस्टरऐवजी मळणी यंत्राद्वारे करून गुळी सुरक्षित ठेवण्याची धडपड सुरू आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून खरीप हंगामात ज्वारीचे पीक घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जनावरांसाठी आवश्यक असलेला कडबा उपलब्ध होत नाही. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील पेरणीही अनिश्चित बनली आहे. पाऊस आणि पाणी नसल्याने ज्वारीचे पीक घेणे शक्य होणार नसेल, तर कडबा मिळणार कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे पशुधनासाठी सोयाबीनची गुळी हाच मोठा आधार ठरण्याची शक्यता आहे. तालुक्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर असल्याने यंदा उपलब्ध होणारी गुळी जपून ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. जनावरांसाठी चारा कमी पडू नये, यासाठी गुळीची सुरक्षित साठवणूक केली जात आहे. काही शेतकरी गरजेनुसार इतर शेतकऱ्यांकडून गुळी विकत घेऊनही साठा करत आहेत. तालुक्यात अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. मात्र, यंदा चाऱ्याची उपलब्धता गतवर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. चारा-पाण्याच्या टंचाईमुळे जनावरे सांभाळणे कठीण होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. चारा छावण्या उभारण्याबरोबरच शासनाने चाऱ्यासाठी होणाऱ्या खर्चाची मदत थेट शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी होत आहे. ----- पावसाअभावी यंदा चारा आणि पाण्याची टंचाई जाणवणार आहे. पशुधन टिकवायचे असेल, तर शासनाने जनावरांसाठी चारा थेट दावणीला उपलब्ध करून द्यावा. -गजानन बादुलगे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com