गावोगावी आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘विशेष पालकमंत्री आरोग्यदूत अभियान’

गावोगावी आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘विशेष पालकमंत्री आरोग्यदूत अभियान’
Published on: 
विशेष पालकमंत्री आरोग्यदूत अभियान राबविणार -प्रत्येक गावाचा स्वतंत्र आराखडा तयार होणार; आरोग्य यंत्रणेस पालकमंत्र्यांचे निर्देश सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १ ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच नियमित, दर्जेदार, सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून ‘विशेष पालकमंत्री आरोग्यदूत अभियान’ राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून आरोग्य सेवा थेट गावपातळीवर पोचविण्यासह प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानाच्या नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी सेलू येथील साई नाट्यगृहात सेलू व जिंतूर तालुक्यांतील आरोग्य विभागाची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आवश्यक निर्देश दिले. अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या सहभागातून प्रत्येक गावाचा स्वतंत्र आरोग्य कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. गावातील आरोग्यविषयक समस्या, आजारांचे प्रमाण, जोखीम गट आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन निश्चित वेळापत्रकानुसार आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत. आरोग्यदूतांच्या गावभेटीदरम्यान नागरिकांची आरोग्य तपासणी, आवश्यक औषधांचे वितरण, समुपदेशन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. गरजेनुसार रुग्णांना उच्चस्तरीय आरोग्य संस्थांमध्ये संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच व्हॉट्सॲप, ग्रामपंचायत, शाळा आणि स्थानिक संवाद माध्यमांच्या मदतीने आरोग्यविषयक जनजागृती केली जाणार आहे. एकही नागरिक आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये, हेच अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना नियमित व दर्जेदार आरोग्य सेवा द्याव्यात. निश्चित कृती आराखड्यानुसार सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री बोर्डीकर यांनी दिले. या बैठकीस पालकमंत्र्यांचे प्रशासकीय सल्लागार डॉ. राहुल आनेराव, अनिकेत पापुलवाड, सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, माजी सभापती दिनकर वाघ, शिवाजी कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, उपजिल्हा रुग्णालय सेलूचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, गटविकास अधिकारी उदय जाधव, जिंतूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आबासाहेब जाधव यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि जिल्हा कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते. ------------------ (((चौकट))) या रुग्णांना देणार विशेष प्राधान्य या अभियानात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, दुर्धर आजारांचे रुग्ण, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. माता-बाल आरोग्य, नियमित लसीकरण, रक्तक्षय प्रतिबंध, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, क्षयरोग, कुष्ठरोग शोधमोहीम यांसह डेंग्यू, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.