बारावीसाठी १९२ विद्यार्थ्यांना अलाॅटमेंट लेटर
---
सीबीएसई, आश्रम, सैनिकी शाळांच्या ऑनलाइन अर्जासाठी विशेष प्रक्रिया
----
छत्रपती संभाजीनगर, ता. २० : राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरताना सीबीएसई, आश्रमशाळा आणि सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात अशा १९२ विद्यार्थ्यांची प्रकरणे प्राप्त झाली होती. शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत विशेष प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी अलाॅटमेंट लेटर देण्यात आल्याचे विभागीय शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांची नोंदणी आणि माहितीची उपलब्धता महत्त्वाची असते. नियमित ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्रणालीत उपलब्ध असते. मात्र, सीबीएसई, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच सैनिकी शाळांमध्ये अकरावीचे प्रवेश स्वतंत्र पद्धतीने होत असल्याने या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करताना अडथळे येतात. या विद्यार्थ्यांची माहिती मंडळाच्या ऑनलाइन प्रणालीशी जोडलेली नसते. त्यामुळे संबंधित शाळांना शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत विशेष प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
या प्रक्रियेमुळे नियमित ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नोंद नसलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेचा अर्ज भरण्याची संधी मिळते. त्यामुळे संबंधित शाळांनी वेळेत विद्यार्थ्यांची माहिती सादर करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव रवींद्र वाणी यांनी सांगितले.
---
अशी राबवली जाते विशेष प्रक्रिया
बारावी परीक्षेसाठी अशा शाळांना विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती जोडून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पत्रव्यवहार करावा लागतो. शाळांकडून प्राप्त झालेल्या विनंतीनंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत प्रकरणे विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठवली जातात. मंडळाकडून आवश्यक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित शाळांना युझर आयडी उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर शाळांना विद्यार्थ्यांचे बारावीचे ऑनलाइन अर्ज भरता येतात.