मतदार यादीच्या पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर
१९, २०, २६, २७ सप्टेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर आयोजन
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ११ : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांची, विशेषतः नवमतदार, महिला व दिव्यांग नागरिकांची शंभर टक्के नोंदणी पूर्ण व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत १० ते ६ पर्यंत विशेष नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांच्या वेळी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी आपापल्या केंद्रांवर वेळेत उपस्थित राहून नागरिकांकडून मतदार नोंदणी, माहितीतील दुरुस्ती तसेच नावे वगळण्याचे अर्ज भरून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता राहावी यासाठी राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (बीएलए) देखील या शिबिरांमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिला व दिव्यांग घटकांना मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी दिव्यांग संघटनांच्या सहकार्याने एकही पात्र दिव्यांग नागरिक नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शिबिराच्या ठिकाणी त्यांच्यासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील नवविवाहित व वंचित महिलांची नावे नोंदवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
युवा नागरिकांची नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे लातूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश पवार यांनी सांगितले.