दगड फेकून मारल्याने तरुण जखमी
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यासह अन्य तिघांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर, ता. १ ः चौघांनी एका २३ वर्षीय तरुणाला दगड फेकून मारल्याने तो जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) रात्री घडली. याप्रकरणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यासह अन्य तिघांवर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. बळिराम देशमाने (वय ३२) असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
प्रशांत सोपान कदम (वय २३, रा. भवानीनगर, जुना मोंढा) हे एका कंपनीत ऑप्टिकल फायबरचे काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता प्रशांत हे त्यांच्या ओळखीच्या जयश्री शिर्के यांच्या घरासमोर उभे राहून त्यांच्याशी बोलत होते. यादरम्यान अचानक त्यांच्यावर दगडांचा मारा करण्यात आला. या अचानक झालेल्या हल्ल्यात एक दगड प्रशांत यांच्या डाव्या डोळ्याखाली आणि डोक्याला लागल्याने ते जखमी झाले. यानंतर त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर प्रशांत यांनी जिन्सी पोलिस ठाणे गाठले. चौकशीदरम्यान त्यांना जयश्री शिर्के यांच्याकडून समजले, की त्यांना जखमी करणारे जोतिराम यमराज यादव (वय ४०), संगीता जोतिराम यादव (वय ३५), बळिराम देशमाने आणि गणेश काळे (वय ३३, सर्व रा. भवानीनगर, जुना मोंढा) हे आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्व चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. यातील देशमाने हा शिंदे गटाचा पदाधिकारी असल्याचे समोर आले.