मायक्रो फायनान्सवर निर्बंध आणणारा कायदा करा आर्थिक मोहोत अडकवणार्या ॲपवर सरकारने बंदी आणावी

मायक्रो फायनान्सवर निर्बंध आणणारा कायदा करा  आर्थिक मोहोत अडकवणार्या ॲपवर सरकारने बंदी आणावी
Published on: 
‘मायक्रो फायनान्स’वर निर्बंध घाला ----- रविकांत तुपकर ः आर्थिक मोहात अडकवणाऱ्या ॲपवर बंदी हवी --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. २८ : शेतकरी आणि सर्वसामान्यांकडून कर्जवसुली करताना मायक्रो फायनान्स, खासगी फायनान्स कंपन्या सावकरांनाही लाजवेल, असे काम करत आहेत. दमदाटी, मारहाण, महिलांशी अर्वाच्य भाषेत बोलणे आदी प्रकार या कंपन्यांकडून नेहमीचे झाले आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांना वेसण घालण्याची गरज आहे. कर्नाटक सरकारने अशा कंपन्यांच्या कामकाजावर निर्बंध घालणारा कायदा केला आहे. तसा कायदा महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी येथे केली. राणी अंकुलगा (ता. शिरूर अनंतपाळ) येथील दत्तात्रय कुंभार (वय २८) याने खासगी वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. कुंभार यांच्या कुटुंबीयांची तुपकर यांनी बुधवारी (ता. २८) भेट घेतली. त्यानंतर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, कार्याध्यक्ष सत्तार पटेल, श्रीराम चलवाड व अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते. तुपकर म्हणाले, ‘‘ऐन दुष्काळात नांदेडनंतर लातूरमध्ये ‘मायक्रो फायनान्स’च्या तगाद्यामुळे एकाचा बळी गेला. आत्महत्या झाल्यानंतरही संबंधित कंपन्या दूरध्वनी करून कुंभार यांच्या कुटुंबीयांकडे पैशांची मागणी करीत होत्या. अनेक शेतकऱ्यांना या कंपन्या त्रास देत आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांवर सरकारने निर्बंध घालणे गरजेचे आहे. कुंभार यांचे कर्ज माफ करून त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी, रिंग ॲप किंवा आर्थिक मोहात अडकविणारे अन्य ॲपवर सरकारने तातडीने बंदी आणावी’’. --- कापूस, सोयापेंडची आयात नको सरकारने दुष्काळग्रस्तांना सरसकट मदत देऊ, असे सांगितले होते. पण, आता वेगवेगळ्या अटी-निर्बंध घालून पाच हजारांची मदत दिली जात आहे. अटींमुळे ही मदत सरसकट शेतकऱ्यांना मिळणार नाही. याआधीही सरकारने मागीलवर्षी झालेल्या अतिवृष्टीवेळी आणि कर्जमाफीवेळी अशाच जाचक अटी लादल्या होत्या. सध्याच्या पाच हजारांच्या मदतीवर आम्ही समाधानी नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे. कापूस, खाद्यतेल, सोयापेंड परदेशातून आयात केली जाऊ नये, भ्रष्टाचार रोखण्यासाठी चारा दावणीला द्या किंवा त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांना द्या, आदी मागण्या तुपकर यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com