कथा : हांजीहांजी...

भावसा मिस्तरीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, चेहरा लालबुंद झाला आणि कानामागं जाळ निघावा असं झाले.
हांजीहांजी...
हांजीहांजी...sakal

- विठ्ठल जाधव

भावसा मिस्तरीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. चेहरा लालबुंद झाला. कानामागं जाळ निघावा असं झाल्त. आज बँकाचा संप व्हता. लई चक्रा माराया लावल्या व्हत्या. मागच्या महिन्यात बँकेचे अधिकारी गावात आल्ते. बैठक घेतली. तव्हा लई गोड बोलले. ‘आमच्याकडे चौपटवाडी हे गाव दत्तक आहे. तुम्हाला लागेल ते कर्ज देऊ. ट्रॅक्टर घ्या. विहीर खांदा, पीककर्ज घ्या. घर बांधा.’ पँटच्या आत सदरा घातलेला. त्यावर पट्टा. ढेरी पुढं करत साहेब ऐटीत बोलला होता.

भावसाचं शिक्षण बरंच झाल्त. बांधकाम डिप्लोमा व्हता. शिक्षणाला खर्च झाल्ता. बापाला दोन एकर होती. बापाला गेल्याले दोनेक सालं झाल्ते. भावसाच्या वाट्याला एक एक्कर आल्ती. बहिणीच्या लग्नाचं ताडके -तोडके मिटत व्हते. तव्हार तर ती बाळंतपणाला आल्ती. बायकू रोज लोकाच्या बांधाला जायची. मजुरीत भागत नव्हतं. नवकरीची वाट पाहुन नाद सोडला. ‘सुबेची’ नोंद केल्ती. सुशिक्षित बेरोजगार शिक्का कपाळावर मारल्यागत झाल्त. पोर्ग चिटकल् कुठतरी म्हणून पाव्हण्यानं पोरगी दिल्ती. त्योबी बार फुसका निघला होता. ते नाराज व्हते. मधी भरले व्हते धा-पाच नवकरीला. पण, तिथंबी रॅकेट पकडलं व्हतं. ऊस चरकात पिळून काढावा तसं झाल्त.

महामंडळाची घोषणा झाल्ती. सुशिक्षित बेकार स्वतःच्या पायावर उभे करायचे धोरण होते. रोज पानभर जाहिराती येत. टिमकी वाजवत. भावसा फायलीच्या नादी लागला. कागदं गोळा करत होता. तलाठ्यांकडं गेला. सात-बारा, आठ-अ घेतला. फोटो, बाँड, प्रतिज्ञापत्र घेतलं. ग्रामसेवकानी रहिवाशी दिलं. तहसिलीत जाऊन उत्पन्नाचे आन् अधिवास प्रमाणपत्र घेतलं. फाइल घेतली. एसटीनं ल. मा. मंडळाचं हापिस गाठलं. तिथं कुणीच नव्हतं. हापिस त् उघडच व्हतं. दारातला शिपायी, ‘काय पाहिजे?’ असं म्हणाल्यावर जरा बरं वाटलं. भावसा पुढं झाला. फाइल दाखवली. महामंडळाचं कर्ज घ्यायचय. ‘सायब, इलेक्शन डिवटीला गेल्येत.’

‘कवा येत्येन?’

‘आता चार पाच दिसांनी या. मधी दोन सुट्याबीयत.’‘बरं’ म्हणत पंधरा दिसांनी चक्कर मारली. ‘आता कायीबी झालं. तरी हाल सोडायचं नाही.’ असं मनोमन ठरविलं. चार-पाच चकरा मारल्या. सोनबा पुढाऱ्याने मध्यस्थी केली. फोन केला. मग साहेब ‘हा’ भरला.चार पाच महिने निघून गेले. सायबाला काही कबूल केले. तव्हा कुठं, ‘बँकेची हमी आणा’ असं म्हणाले. पत्र दिलं. पत्र घेतलं. जिंकल्याचा आनंद झाला. रोज बँकेत चकरा मारी. दमला. ‘लघुकर्ज प्रकरण- दर शुक्रवारी दु. २ ते ४ या वेळेत भेटा.’ असा ठळक बोर्ड लावला होता. त्या वेळेत खुर्चीत कुणीच नसायचं. सुशिक्षित बेकार प्रकरण म्हटलं की ‘या नंतर.’ नंतर गेलं की ताजा सातबारा घेऊन या. तो आणायला भाऊसायबाचं हापिस बंद. ते पंचनामा करायला. कसातरी ऑनलाइन सातबारा काढला. आधार कार्ड, पॅन कार्ड, सीबिल, अर्जही दिला. बँकेत गर्दी असायची. पीककर्ज नवजुनं चालू होतं. काचेच्या खिडकीतून सायब बाटलीने पाणी पिताना दिसला. चष्म्याच्या वरून बघत होता. काचेतून हात आत घातला. ‘सायेब यवढं कर्जहमी पाहिजे’ साहेब बोलला, ‘नवीन साहेब आलेत. परवा या.’ लवकर ऐकूच आलं नाही.

भावसा हिरमुसला. घरी गेला. तुरी बाजारात आणल्या. तोपर्यंत भाव उतरला. दोन पाच जवळ ठेवले. कर्जाची हमी बँकेकडून मिळेल. मग एखादा उद्योग करता येईल. संसाराला आधार मिळंल. भावसा पुन्हा बँकेत गेला. आज साहेबाला गटविलं. ‘सायब, लई चकरा मार्ल्यात बघा. एवढं हमीपत्र द्याना.’

‘हमीपत्राला ओळख हवी. दोन प्रतिष्ठित व्यक्तींची’‘म्हंजी?’

‘पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, मोठा व्यापारी यांची ओळख द्यावी लागेल’‘काय राव सायब? मग एकखट्या सांगायच ना सगळं.’‘तशी प्रोसिजर असती. बरं यापूर्वी कुठं कर्ज घेतलं असल, नसल त् बेबाक आणावा लागल.’‘बरं आणतो.’ म्हणत चालता झाला.कागदं गोळा करताना नाकी नऊ आल्ते. पण, हरायचं नाही अस ठरविलं होत. भावकीतला सदस्य होता. त्याची ओळख दिल्ती. हमीपत्र मिळाले. परत महामंडळाच हापिस गाठलं. प्रकरण मंजूर झालं. एका महिन्याची मुदत होती. परत बँकेत आला. चेक मिळणार होता. ‘एक सरकारी माणूस जामीनदार पायजे.’ सायब बोलत होते. चऱ्हाट लांबत होतं. ‘पहिलच बोलायचना.’ भावसा वैतागून गेल्ता. तेवढ्यात एकजण पाच सहा प्रकरणं आणलेले. मंजूर होती. चेक मिळाले होते. भावसानं हाटकिलं. ‘कसं काय झाले ब्वा, एवढे मंजूर!’ तो बोलला, ‘त्याला काय, साहेब सांभाळले की सगळं व्हतय.’ त्याचे लागेबांधे होते. त्याने बँकीतबी झटपट सह्या घेतल्या.

भावसाला सरकारी माणूस जामीनदार मिळाला नाही. शोधाशोध केली. ‘एखादा एजंट गाठला असता त् बरं झाल असतं. उगच झंजटीत पडलो.’ मनाशीच पुटपुटला. घरी गेला. ढसाढसा पाणी पिला. धा-पंधरा दिवस झाले. बायको एकाएकी आजारी पडली. पळापळ झाली. दवापाणी पाहिलं. फाइलची मुदत संपली. फाइल तशीच पेंडिंग राहिली.

शिरूर कासार, जि.बीड

हॅलो ९४२१४४२९९५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com