अधिकारी म्हणाले ः मोठे झाल्यावर कोण होणार?
--------------------------------------------
विद्यार्थी म्हणाला ः मी ट्रॅक्टर घेऊन वाळू विकणार!
-------------------------------------------
-गुंज परिसरात मुलांच्या शैक्षणिक, मानसिक जडणघडणीवर परिणाम
------------------------
धनंजय देशपांडे
पाथरी, ता. १५ ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठी स्वप्ने पाहावीत, अशी अपेक्षा असताना तालुक्यातील गुंज या छोट्याशा गावातील विद्यार्थ्याच्या तोंडून मात्र ‘आम्हालाही ट्रॅक्टर घेऊन वाळू विकायचीय!’ असे उद्गार ऐकायला मिळत आहेत. या व्यवसायातून झटपट मिळणाऱ्या पैशांचे आकर्षण आता लहान मुलांनाही वाटू लागले असून, याचा त्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक जडणघडणीवर परिणाम होत असल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे.
तालुक्यातील गुंज हे जवळपास तीन हजार लोकसंख्येचे गाव. या गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत तर दहावीपर्यंत खासगी संस्थेची शाळा आहे. या गावातील मुख्य व्यवसाय शेती असला तरी या गावातील ६० टक्के ग्रामस्थांनी पारंपरिक मजुरीची कामे सोडून वाळू भरणे, वाळू वाहतूक करणे, वाळूचे लोकेशन देणे आदी कामांकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे. या व्यवसायातून तुलनेने अधिक आणि कमी वेळेत जास्त पैसे मिळत असल्याने अनेकांना त्याचे आकर्षण निर्माण झाले आहे. दिवसभर कष्ट करून मिळणाऱ्या मजुरीपेक्षा वाळू व्यवसायातील कमाई अधिक असल्याची चर्चा गावात होत आहे. या आर्थिक आकर्षणाचा परिणाम आता भावी पिढीवरही होताना दिसत आहे. घरातील मोठी माणसे वाळू व्यवसायातून पैसे कमावत, त्या विषयावर बोलत असल्याचे पाहून शालेय विद्यार्थ्यांच्या मनातही त्याच व्यवसायाचे आकर्षण निर्माण होत आहे.
गावातील बदलत्या आर्थिक परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या विचार विश्वावर नेमका काय परिणाम होत आहे, याकडे पालक, शिक्षक आणि समाजातील जाणकारांनी लक्ष देण्याची गरज आहे. पैसा कमावणे महत्त्वाचे असले तरी शिक्षणातून मिळणारे ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याची संधी यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगणे काळाची गरज बनली आहे. वाळूच्या पैशांचे आकर्षण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर मात करणार का? की शिक्षणाच्या बळावर हिच मुले उद्याचे सक्षम नागरिक बनणार, हा प्रश्न गुंज परिसरातील सद्यःस्थितीमुळे उपस्थित होत आहे.
((चौकट))
उत्तराने अधिकारी-शिक्षक स्तब्ध
याबाबत गुंज येथील एका शाळेतील शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर एक भीषण वास्तव मांडले. शाळेत आलेल्या शिक्षण विभागाच्या पथकातील एका अधिकाऱ्याने एका विद्यार्थ्यास, तुला मोठं होऊन काय करायचे असा प्रश्न विचारला असता त्याने, ‘मला ट्रॅक्टर घेऊन वाळू विकायची आहे’, असे उत्तर दिले. यावर उपस्थित पथकातील अधिकारी व शिक्षक स्तब्ध झाले.
(((चौकट)))
समाज व्यवस्थेसाठी चिंतेची बाब
शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी किंवा इतर क्षेत्रांत करिअर करण्याऐवजी ‘मोठे झाल्यावर आम्हीही ट्रॅक्टर घेऊन वाळू विकणार’! अशी भावना मुलांच्या मनात रुजत आहे. ही बाब केवळ एका व्यवसायाकडे विद्यार्थ्यांचा असलेला कल म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. लहान वयातच झटपट पैसा मिळवण्याचे आकर्षण निर्माण होणे, शिक्षणापेक्षा वाळू व्यवसायातील कमाईला अधिक महत्त्व मिळणे आणि भविष्यातील ध्येयांबाबतची दृष्टी बदलणे, ही समाजव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे.