दुष्काळातील मानसिक आरोग्यावर विद्यार्थ्यांचे पथनाट्य
धाराशिव, ता. ११ (बातमीदार) : दुष्काळी परिस्थितीचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम अधोरेखित करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. जिल्हा मानसिक आरोग्य दिनानिमित्त शनिवारी (ता. १०) आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दुष्काळ आणि मानसिक आरोग्य हा विषय प्रभावीपणे मांडला.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्वाती पांढरे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. महेश कानडे, डॉ. आशीष झरे, मीना शेडे आणि संध्या निकम यांची उपस्थिती होती. डॉ. पांढरे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचे कौतुक केले. मानसिक आजारांविषयी समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. कानडे यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने १० ते १६ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘मनजागृती’ राष्ट्रीय मानसिक आरोग्य जनजागृती अभियानाची माहिती दिली. तसेच मानसिक आरोग्यविषयक मदतीसाठी उपलब्ध असलेल्या टेलिमानसच्या १४४१६ या टोल फ्री क्रमांकाची माहितीही त्यांनी दिली.
प्रास्ताविक डॉ. झरे यांनी तर आभार समाजसेवा अधीक्षक ज्ञानेश्वर भैरी यांनी मानले. आयोजनासाठी रुग्णालयातील विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि समुपदेशकांनी पुढाकार घेतला.