निवृत्तीवेतनधारकांनो, ३० नोव्हेंबरपर्यंत द्या हयातीचे दाखले
प्रत्यक्ष उपस्थिती सोबतच ऑनलाइन सुविधाही उपलब्ध
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ ः नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करावा लागतो. मग त्यांचे पुढील वर्षभर निवृत्तीवेतन सुरू राहते. यंदा ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र, आता हयातीचे दाखले सादर करण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थिती सोबतच ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सन २०२६-२७ या वर्षासाठीचे हयातीचे दाखले १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी वैजनाथ शेळके, सहायक संचालक सुषमा बुरकुले यांनी केले आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतनधारकांचे नाव, निवृत्तीवेतन क्रमांक व बँक खाते क्रमांक नमूद असलेले मुद्रित हयातीचे दाखले संबंधित बँक शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत स्वतः संबंधित बँक शाखेत उपस्थित राहून आपल्या नावासमोरील मुद्रित दाखल्यावर स्वाक्षरी करावी. निवृत्तीवेतन सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी हयातीचा दाखला विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन ३० नोव्हेंबरपूर्वी हयातीचे दाखले सादर करावेत आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी वैजनाथ शेळके व सहायक संचालक सुषमा बुरकुले, निवृत्तीवेतन शाखा यांनी केले आहे.
----
निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीबाबत नियतकालिक ओळख पडताळणी करण्यात येते. या प्रक्रियेसाठी निवृत्तीवेतनधारकांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- बँक शाखेत प्रत्यक्ष उपस्थिती : निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या संबंधित बँक शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्यांच्या समक्ष हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी करून तो सादर करता येईल.
- डिजिटल जीवनप्रमाण पोर्टल : https://jeevanpramaan.gov.in/v2.0/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने हयातीचा डिजिटल दाखला सादर करता येईल.
- स्थानिक प्रमाणपत्राद्वारे : विहित नमुन्यातील हयातीच्या दाखल्यावर बँक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या समक्ष स्वाक्षरी करून तो जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करता येईल.
- इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) : भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत डिजिटल हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- मोबाइल ॲपद्वारे : अँड्रॉइड किंवा आयओएस मोबाइलमध्ये जीवन प्रमाण ॲप डाउनलोड करून डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येईल.
------