शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत सादर करावी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अनुदानित संस्थांना आदेश
विद्यापीठ परिसर, ता. २० ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व अनुदानित संस्थांच्या महाविद्यालयांचे प्राचार्य आणि परिसंस्थांच्या संचालकांसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक परिपत्रक जारी केले. महाविद्यालयांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबर तत्काळ विद्यापीठाकडे सादर करण्याचे सांगितले आहे.
हे परिपत्रक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपापल्या शिक्षण संस्था, विश्वस्त संस्था किंवा खासगी व्यवस्थापनाच्या अध्यक्ष व सचिवांच्या तातडीने निदर्शनास आणून द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. सदर परिपत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.bamu.ac.in) उपलब्ध आहे. विशेष विवरणपत्रात माहिती भरणे अनिवार्य असणार आहे. परिपत्रकासोबत एक विशेष तक्ता (विवरणपत्र) जोडला आहे. त्यामध्ये प्रवर्गनिहाय आरक्षणाची टक्केवारी स्पष्ट केली. संस्थांना खालील प्रवर्गांनुसार भरलेली आणि रिक्त पदे दर्शवावी लागणार आहेत. अनुसूचित जाती १३ टक्के, अनुसूचित जमाती ७, विजा-अ ३, भज-ब २.५, भज-क ३.५, भज-ड २, विमाप्र २, इमाव १९, आदुध १०, आणि अराखीव २८ टक्के या विवरणपत्रावर संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि प्राचार्य-प्रशासकीय अधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. ही माहिती मुदतीत सादर न करणाऱ्या महाविद्यालयांवर विद्यापीठाकडून कडक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठाचे उपकुलसचिव (विशेष कक्ष) यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.