जिल्ह्यात गाळप हंगामाला वेग
- पाच कारखान्यांकडून दोन लाख टनांवर ऊस गाळप
- एक लाख २६ हजार ७५० क्विंटल साखर उत्पादित
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २६ ः जिल्ह्यात पाच साखर कारखान्यांकडून २०२६-२७ च्या चालू गळीत हंगामाला उत्साहात सुरवात झाली असून, अजूनही नऊ कारखाने सुरू होणे बाकी आहेत. जिल्ह्यातील एकूण १४ पैकी ५ कारखान्यांनी प्रत्यक्षात गाळप सुरू केले आहे. यामध्ये २ सहकारी आणि ३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. रविवारअखेर (ता. २५) दोन लाख १ हजार ५८९ टन उसाचे गाळप होऊन एक लाख २६ हजार ७५० क्विंटल साखर उत्पादित झाली आहे.
जिल्ह्यात एकूण १४ पैकी ५ कारखाने सुरू झाले असून, यामध्ये २ सहकारी (दैनिक गाळप क्षमता ६ हजार २५० टन) आणि ३ खासगी (दैनिक गाळप क्षमता १९ हजार ५०० टन) कारखान्यांचा समावेश आहे. रविवारपर्यंत जिल्ह्यातील सर्व सुरू असलेल्या कारखान्यांच्या माध्यमातून एकूण २ लाख १ हजार ५८९ टन उसाचे गाळप झाले आहे. यामध्ये सहकारी कारखान्यांनी ३३ हजार १९५ टन तर खासगी कारखान्यांनी १ लाख ६८ हजार ३९४ टन उसाचे गाळप केले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात गाळप हंगामात १४ कारखान्यांनी सहभाग घेतला होता. यंदा अद्यापपर्यंत पाच कारखाने सुरू झाले असले तरी अजून नऊ कारखाने कधी सुरू होतात, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात इतर कारखानेही सुरू होण्याची शक्यता आहे.
...........
साखर उतारा ६.२९ टक्के
दोन लाख १ हजार ५८९ टन उसाच्या गाळपापासून एकूण १ लाख २६ हजार ७५० क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. यामध्ये सहकारी कारखान्यांचे १७ हजार २५० क्विंटल, तर खासगी कारखान्यांचे १ लाख ९ हजार ५०० क्विंटल साखर उत्पादन झाले असून जिल्ह्याचा एकूण निव्वळ साखर उतारा ६.२९ टक्के इतका नोंदवला गेला आहे.
........
प्रमुख कारखान्यांची स्थिती
- भैरवनाथ शुगर वर्क्स, ढोकी ः हा ५ हजार टन दैनिक क्षमता असलेला हा कारखाना १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाला असून, याद्वारे १६ हजार ७०५ टन ऊस गाळप व ९ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
- नरसिंह (इंदापूर) : हा सहकारी कारखाना १६ ऑक्टोबरला सुरू झाला असून, याद्वारे एकूण ९ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादित झाली आहे.
- भैरवनाथ शुगर वर्क्स (सोनारी, ता. परंडा) : या खासगी कारखान्याने १८ ऑक्टोबर रोजी गाळप सुरू केले असून ३९ हजार १८४ टन ऊस गाळप केले आहे.
- कंचेश्वर शुगर लि. (मंगळूर, ता. तुळजापूर) : १७ ऑक्टोबरला सुरू झालेल्या या कारखान्याने ५१ हजार ४२० टन ऊस गाळप आणि ३६ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
- नॅचरल शुगर ॲण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. (रांजनी, ता. कळंब) : १२ ऑक्टोबरला सुरू झालेला हा कारखाना जिल्ह्यातील सर्वाधिक ७७ हजार ७९० टन ऊस गाळप करणारा व ४८ हजार क्विंटल साखर उत्पादन करणारा अग्रेसर कारखाना ठरला आहे.