ऊस उत्पादकांच्या मागण्यांकडे कारखानदारांची पाठ
बीड, ता. १८ (बातमीदार) ः जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांच्या आणि चालू हंगामातील दराच्या प्रश्नावर केज तहसील कार्यालयात आयोजित केलेली संयुक्त बैठक कारखानदारांच्या अनुपस्थितीमुळे निष्फळ ठरली. थकीत बिले न मिळाल्यास व दर जाहीर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. दुष्काळामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना येडेश्वरी कारखान्याने दर जाहीर न करताच गाळप सुरू केले आहे. शेतकरी प्रतिनिधींनी आरोप केला आहे की, येडेश्वरीकडे गतवर्षीचे प्रतिटन २०० रुपये, गंगामाऊलीकडे ५० रुपये, तर अंबासाखरकडे तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार अशोक भंडारे यांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, तहसीलदारांनी वारंवार संपर्क साधूनही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरवली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे आणि संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत कारखानदारांसह लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गतवर्षीची थकबाकी तातडीने द्यावी आणि चालू हंगामाचा दर जाहीर करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. यावेळी केशव नाना ढगे, सतीश शिंदे आणि लालासाहेब ठोंबरे आदी उपस्थित होते.