साखर कारखानदारांकडून
शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण
ढोकीत खासदार, आमदारांच्या फोटोंचे फ्लेक्स चर्चेत
ढोकी, ता. ८ (बातमीदार) ः जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी तेरणा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्ह्यातील खासदार आणि चार आमदारांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले असून, या मागणी पत्राचा ढोकी येथील बसस्थानक चौकात उभारलेला मोठा डिजिटल फ्लेक्स पाहून चर्चेला उधाण आले आहे.
कोल्हापूर-सांगलीच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यात ऊस दरात प्रतिटन तब्बल ७०० ते ८०० रुपयांची तफावत असते. हे आर्थिक शोषण वर्षानुवर्षे सुरू असून जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येमागे हे देखील एक प्रमुख कारण असल्याचे शेतकऱ्यांनी पत्रात नमूद केले आहे. या शोषणाविरोधात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून आपली मतदारांप्रती असलेली बांधिलकी दाखवून द्यावी, असे स्मरण पत्रातून करून देण्यात आले आहे. हे निवेदन मंगळवारी (ता. सहा) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार तानाजी सावंत यांच्या अधिकृत मेलवर पाठवण्यात आले आहे. ढोकी चौकातला हा बोर्ड येण्या-जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत असून, तेरणा परिसरात सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. या निवेदनावर सुधाकर पाटील, दत्ता कोकाटे, दत्तात्रय देशमुख, गोरोबा डांगे, सुरेश समुद्रे, उत्तम वाकुरे आणि श्यामराव देशमुख यांच्यासह २३ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
......
ढोकी ः साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादकांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींना दिलेल्या निवेदनाचे लावलेले फ्लेक्स.
.....
फोटो क्रमांक ः OSM26B07141