फेब्रुवारीअखेरच धुराडी बंद होण्याची चिन्हे
उसाचे क्षेत्र वाढूनही गाळप, साखर उत्पादन २० टक्क्यांनी घटणार
........
अविनाश पोफळे ः सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १३ ः जिल्ह्यात २०२५-२६ या नवीन ऊस गळीत हंगामाला सुरवात झाली आहे. चार कारखान्यांनी गाळप सुरू केले असून इतर १० साखर कारखान्यांचे चाक फिरण्यास सज्ज झाले आहे. मात्र, यंदा मॉन्सूनच्या पावसाने दिलेली ओढ आणि पडलेला प्रदीर्घ खंड यामुळे उसाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एकूण ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले असले, तरी कोरडवाहू आणि पाण्याच्या टंचाईमुळे तब्बल १८ हजार हेक्टरवरील ऊस गाळपायोग्य राहिलेला नाही. परिणामी, यंदा ६० हजार हेक्टर ऊस उपलब्ध असूनही एकूण ऊस गाळप आणि साखर उत्पादनात २० ते २५ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज साखर क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
........
मागील हंगाम विरुद्ध यंदाचा हंगाम
मागील वर्षी मुबलक पाऊस असल्याने आणि गळीत हंगाम एप्रिल अखेरपर्यंत चालल्याने विक्रमी गाळप झाले होते. परंतु, यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.
प्रमुख मुद्दे...मागील हंगाम...यंदाचा हंगाम...फरक / परिणाम
एकूण ऊस क्षेत्र...५४,००० हे...७९,००० हे.(२५ हजार हेक्टर नवीन)...क्षेत्र वाढले, पण पावसाचा फटका
गाळप योग्य उपलब्ध ऊस...५४,००० हे...६०,००० हे...पाण्याअभावी १८ हजार हेक्टर ऊस वाया
एकूण गाळप...६१.०६ लाख टन...४५ ते ५० लाख टन (अंदाज)...२० ते २५ टक्के घटीची शक्यता
साखर उत्पादन...४८.४२ लाख क्विंटल...३६ ते ४० लाख क्विंटल (अंदाज)...उत्पादनात घसरणीची शक्यता
हंगामाचा कालावधी...एप्रिल अखेरपर्यंत चालला...फेब्रुवारीअखेर संपण्याची चिन्हे...हंगाम २ महिने आधीच आटोपणार
..........
उताऱ्यावरही परिणाम होणार
गेल्या वर्षी जिल्ह्यात अतिपाऊस झाल्याने २५ हजार हेक्टरवर नव्याने लागवड झाल्याने एकूण क्षेत्र ७९ हजार हेक्टरवर गेले होते. मात्र, यंदा पावसात मोठा खंड पडल्याने १८ हजार हेक्टरवरील उसाची वाढ पूर्णपणे थांबली आहे. हा ऊस गाळपासाठी योग्य उरलेला नाही. ज्या उसाचे गाळप होणार आहे, त्याचीही कांड्यांची संख्या आणि वजन कमी भरत असल्याने वजनात मोठी घट येणार आहे. तसेच पाण्याचा ताण बसल्याने साखरेचा उतारा देखील घटण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
......
फेब्रुवारीअखेरच कारखाने बंद होणार
मागील वर्षी सर्व १४ कारखान्यांचे रोलर एप्रिल अखेरपर्यंत अविरत फिरत होते आणि ६१ लाख टनांचा टप्पा पार झाला होता. परंतु, यंदा उसाचे वजन घटल्यामुळे हा हंगाम दीड ते दोन महिने आधीच, म्हणजेच फेब्रुवारी २०२६ च्या अखेरपर्यंतच आटोपेल, असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला आहे.
...........
((कोट))
गेल्या वर्षी गाळपायोग्य उसाचे ५४ हजार हेक्टर क्षेत्र होते. तेव्हा अतिपाऊस झाल्याने २५ हजार हेक्टर उसाची नव्याने लागवड वाढून एकूण क्षेत्र ७९ हजार हेक्टरवर गेले. त्यामुळे यंदा ऊस गाळप वाढण्याचे चित्र यंदाच्या पावसाळ्याच्या सुरवातीला होते. मात्र, यंदा अत्यल्प पाऊस आणि त्यात मोठा खंड पडल्याने १८ हजार हेक्टरवरील उसाची वाढ पूर्णपणे थांबली. हा ऊस गाळपासाठी जाणार नाही. त्यामुळे ६० ते ६१ हजार हेक्टर ऊस यंदा गाळपास उपलब्ध होईल.
- प्रवीण चोपडे, तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय
.................
((कोट))
उसाच्या नोंदी आहेत, मात्र पावसाअभावी उसाची वाढ झालेली नाही. त्यामुळे निश्चितपणे वजन घटून ॲव्हवरेज कमी येणार आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन २० टक्क्यांनी कमी होईल असे दिसते. परिणामी, फेब्रुवारी अखेरच्या आतच गाळप हंगाम संपेल.
- पांडुरंग आव्हाड, संचालक, नॅचरल शुगर, रांजणी
.....................
((कोट))
नऊ एकर ऊस आहे. मागील वर्षी त्यात ६३८ टन उत्पादन मिळाले होते. यंदा ते ५०० टनांच्या आताच राहील. कारण, मागील वर्षी ऊस ३२ ते ३३ कांड्यांवर होता. यंदा तो २० ते २२ कांड्यांवर आहे. अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पादन घटणार आहे.
- बाळासाहेब पाटील, शेतकरी, माळकरंजा, ता. कळंब