फोटो क्रमांक- OSM26B07298
कनगरा (ता. धाराशिव) ः पशुंना चारा म्हणून उसापासून शास्त्रीय पद्धतीने मुरघास तयार करण्यासाठी उसाची केली जाणारी कुट्टी.
----------------
अवघ्या ४५ दिवसांत जनावरांसाठी पौष्टिक चारा
उसापासून मुरघास निर्मिती; कनगराच्या विनोद इंगळे यांचा पुढाकार
धाराशिव, ता. २८ (बातमीदार) ः हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होत असताना पशुधनाचे संगोपन कसे करायचे, हा पशुपालकांसमोरील मोठा प्रश्न असतो. मात्र, या संकटावर मात करण्यासाठी कनगरा (ता. धाराशिव) येथील प्रयोगशील पशुपालक विनोद इंगळे यांनी उपलब्ध उसाचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून त्यापासून मुरघास तयार करण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे.
कनगरा येथील पशुपालक विनोद इंगळे हे स्वतःच्या शेतामध्ये असलेल्या उसापासून मुरघास तयार करत आहेत. तीन टन मुरघासमध्ये अडीच टन उसाची कुट्टी करून एकत्रित केली जाते. त्यात कल्चर पावडरचे चार पुडे मिसळून ते पोत्यामध्ये भरताना ठराविक थरावर मक्याचे अर्धा क्विंटल भरड टाकले जाते. ऊसामध्ये ओलावा अधिक असल्याने मक्याची भरड टाकल्यास ओलावा कमी होण्यास मदत होते. कल्चर पावडर, उसाची कुट्टी, मका भरड एकत्रित करून तयार केलेला मुरघास पोत्यामध्ये ४५ दिवस हवाबंद असेल अशा पद्धतीने साठविला जातो. ४५ दिवसांनंतर तो पशूंना आहार म्हणून दिला जातो, असे इंगळे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन पशुपालकांना पर्यायी चारानिर्मितीचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून भर दिला जात आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. दीपक मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी कनगरा येथील इंगळे यांच्या शेताला भेट देऊन उसापासून मुरघास निर्मितीच्या प्रयोगाची पाहणी करून पशुपालकांना मार्गदर्शन केले.
......................
((कोट))
उसापासून शास्त्रीय पद्धतीने तयार केलेला मुरघास हा जनावरांसाठी पौष्टिक चाऱ्याचा पर्याय ठरू शकतो. हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत असताना योग्य पद्धतीने तयार केलेल्या मुरघासचा उपयोग पशुधनाच्या आहारात करता येतो.
- डॉ. दीपक मुळे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
...............
((कोट))
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुरघास निर्मितीकडे वळल्यास चारा व्यवस्थापनासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
- सागर खटकाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
...............
((कोट))
माझ्याकडे ४० जनावरे आहेत. त्यांना चारा वेळेत उपलब्ध व्हावा, यासाठी स्वतःच्या शेतामध्ये असलेल्या उसापासून मुरघास तयार करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. उसावर शास्त्रीय प्रक्रिया करून तयार केलेला मुरघास योग्य पद्धतीने साठवून ठेवता येतो. यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्याची आपली तयारी आहे.
- विनोद इंगळे, पशुपालक, कनगरा