बगॅस, मळीपासून तयार होणार जनावरांसाठी ''सुपरफूड''

बगॅस, मळीपासून तयार  होणार जनावरांसाठी ''सुपरफूड''
Published on: 
उसाची चिपाडे, मळीपासून जनावरांसाठी खाद्य -- धाराशिव जिल्हा प्रशासनातर्फे ‘सुपरफूड’च्या प्रयोगासाठी चाचपणी सुरू --- धाराशिव, ता. ८ : जिल्ह्यातील चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर, पशुधन वाचवण्यासाठी आणि दुग्धोत्पादन टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कल्पक, वैज्ञानिकरीत्या पुढाकार घेतला आहे. साखर कारखान्यातून उपउत्पादन म्हणून निघणाऱ्या ‘बगॅस’ (उसाची चिपाडे) आणि ‘मोलॅसिस’वर (मळी) शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्यापासून पौष्टिक, किफायतशीर पशुखाद्य तयार करण्याचा नवा मार्ग शोधण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ढोकी येथील साखर कारखान्याला नुकतीच भेट देऊन बगॅस व मळीच्या उपलब्धतेची पाहणी केली. केवळ कोरडी उसाची चिपाडे पचण्यास जनावरांना कठीण जाते. त्यावर युरिया, मळी आणि खनिज मिश्रणाची प्रक्रिया केल्यास त्याची पचनक्षमता आणि पोषणमूल्य वाढते. या पार्श्वभूमीवर, ढोकी साखर कारखान्याच्या मदतीने तातडीने एक प्रक्रिया प्रारूप (प्रोसेसिंग मॉडेल) तयार करून प्रायोगिक तत्त्वावर असे पूरक खाद्य तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच वितरण -- प्रक्रिया केलेले हे खाद्य जनावरांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी जिल्हा व विभागीय पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत त्याची विशेष तपासणी केली जाईल. त्यातील पचनक्षमता, क्रूड प्रोटीन आणि विषबाधा प्रतिबंधक मानके योग्य असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच हे खाद्य पशुपालकांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. गोठ्यापर्यंत पोचणार प्रयोग -- हा प्रयोग (तंत्रज्ञान) यशस्वी झाल्यानंतर केवळ कारखान्यापुरता मर्यादित न ठेवता ग्रामपातळीवर नेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. शेतकरी स्वतःच्या स्तरावर सोप्या पद्धतीने उचाची चिपाडे व मळीवर प्रक्रिया कशी करू शकतात, याचे प्रात्यक्षिक पशुसंवर्धन विभागामार्फत दिले जाणार आहे. तसेच, दुष्काळात पशुपालकांना माफक व नियंत्रित दरात चिपाडे व मळी उपलब्ध व्हावी, यासाठी कारखान्यांसोबत पूर्वतयारीचे धोरण आखण्यात येत आहे. ....... कोट -- चारा टंचाईच्या काळात स्थानिक संसाधनांचा वैज्ञानिक वापर करून जनावरांना स्वस्त व शाश्वत खाद्य उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास टंचाईच्या काळात पशुपालकांना मोठा आर्थिक आधार मिळेल. - कीर्तीकिरण पुजार, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com