(अँकर)
उसाचे नुकसान टाळण्यासाठी तोडणीला प्राधान्य द्या
शेतकऱ्यांची साखर कारखान्यांकडून अपेक्षा; पाणीटंचाईमुळे वाढली चिंता
परतूर, ता. ९ : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने परिसरातील ऊस पिकावर संकट ओढवले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून, अनेक शेतकऱ्यांकडे उसाला पाणी देण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे उभा ऊस वाळण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ऊस पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कारखान्याने ऊसतोडणीला प्राधान्य देत ऊस लवकर न्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
परिसरात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऊस हे दीर्घ कालावधीचे आणि मोठ्या प्रमाणात पाणी लागणारे पीक असल्याने पाण्याअभावी त्याच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून ऊस लागवड केली असून, आता पाणी उपलब्ध नसल्याने पिकाची जोपासना करणे कठीण झाले आहे. पिकाला वेळेवर पाणी मिळाले नाही, तर उत्पादनात घट होण्याबरोबरच आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते.
दरम्यान, बागेश्वरी साखर कारखान्याचा गाळप हंगाम १२ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे कारखान्याने पाणीटंचाईचा विचार करून ऊसतोडणीचे नियोजन करावे आणि पाण्याअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्याने तोड द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. ऊस वेळेत कारखान्यात गेल्यास पिकाचे होणारे संभाव्य नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते.
पाणीटंचाई आणि पिकाच्या नुकसानीच्या भीतीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादकांच्या अडचणी लक्षात घेऊन ऊसतोडणी व वाहतुकीचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
....................
चौकट :
निम्न दुधना प्रकल्पात केवळ १९ टक्के पाणीसाठा
निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा घटल्याने परिसरातील पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. प्रकल्पात केवळ १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना उसाला पाणी देणे कठीण झाले आहे. परिणामी, ऊस पीक धोक्यात आले असून, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने उसाला लवकर तोड द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
--------