पान १ अँकर
---
चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुपालकांची फडाकडे धाव
जनावरांना ‘वाढ्या’चा आधार; प्रतिशेकडा ६०० ते ७०० रुपये दर
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १२ ः जिल्ह्यात सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमात सुरू असून, ठिकठिकाणी ऊस तोडणीच्या कामांनी वेग घेतला आहे. परतीच्या पावसाने दिलेली ओढ आणि भविष्यातील भीषण चाराटंचाईची शक्यता पाहता, हा गळीत हंगाम शेतकरी व पशुपालकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या भुकेचा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या उसाच्या वाढ्याला मोठी मागणी आली असून, पशुपालक थेट फडावर जाऊन वाढे खरेदी करत आहेत.
यंदा जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील चारा पिकांचे उत्पादन घटले आहे. हिवाळ्याच्या सुरवातीलाच चाराटंचाईचे सावट निर्माण झाल्याने, आगामी उन्हाळ्यापर्यंत जनावरे जगवायची कशी, ही मोठी चिंता शेतकऱ्यांसमोर होती. मात्र, कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ही चिंता काही अंशी मिटली आहे. पुढील तीन ते चार महिने ऊसतोडणी सुरू राहणार असल्याने, यादरम्यान जनावरांना हिरवा चारा म्हणून उसाचे वाढे उपलब्ध होणार आहेत.
उसाच्या वाढ्याला वाढती मागणी असल्याने दरातही तेजी आली आहे. ऊसतोडणीच्या ठिकाणी थेट शेतात जाऊन खरेदी केल्यास वाढ्याच्या पेंडीला प्रतिशेकडा ६०० ते ७०० रुपये दर मिळत आहे. बाहेरून चारा आणल्यास वाहतुकीचा मोठा खर्च लागतो, तो वाचविण्यासाठी आजूबाजूच्या गावांतील पशुपालक स्वतःची वाहने किंवा बैलगाड्या घेऊन फडावर पोहोचत आहेत. भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन अनेक पशुपालक सध्या जास्तीचे वाढे खरेदी करून, ते वाळवून त्याची साठवणूक करत आहेत.
-----
पशुपालकांची मोठी धावपळ सुरू
चाराटंचाईमुळे पशुपालकांची मोठी धावपळ सुरू आहे. वाहतुकीचा खर्च वाचवण्यासाठी आणि ताजा चारा मिळवण्यासाठी शेतकरी स्वतःची वाहने घेऊन थेट ऊसतोडणीच्या ठिकाणी म्हणजेच फडावर पोहोचत आहेत. तिथेच जागेवर व्यवहार करून वाढे खरेदी करण्याला पसंती दिली जात आहे.
------
भविष्यासाठी चाऱ्याची साठवणूक
गळीत हंगाम केवळ ३-४ महिने चालणार आहे. त्यानंतर पुन्हा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, अनेक पशुपालकांनी आत्ताच अतिरिक्त वाढे खरेदी करून ते वाळवून साठवून ठेवण्यास (गंज लावण्यास) सुरवात केली आहे. पावसाळ्यापर्यंत जनावरांची भूक भागवण्यासाठी हा एक मोठा आधार ठरणार आहे.
------
पावसाळ्यापर्यंत चाऱ्याची सोय करणे गरजेचे
यंदा पाऊस नसल्यामुळे जनावरांसाठी हिरवा चारा नाही. पावसाळ्यापर्यंत चाऱ्याची सोय करणे गरजेचे असल्याने, हिरवा चारा कमी पडू नये म्हणून मी थेट शेतात जाऊन प्रतिशेकडा ६०० रुपये दराने उसाचे वाढे विकत घेतले आहेत," असे शेतकरी विकास राऊत यांनी सांगितले.
-------------------------------