परजिल्ह्यात स्थलांतर केलेल्या ११ मजुरांवर २० दिवसांत काळाचा घाला
गोड साखरेची कडू कहाणी; जन्मभर संघर्ष, त्यात जीवनसाथी हिरावल्याची भावना
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १६ (बातमीदार) : राज्याला आणि देशाला गोडवा देणाऱ्या साखरेचे उत्पादन करण्यासाठी आपल्या घामाचा पाट वाहणाऱ्या बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या वाट्याला मात्र आयुष्याची अत्यंत कडू कहाणी आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि दोन वेळच्या भाकरीसाठी गाव सोडून ऊसतोडीसाठी फडात गेलेल्या बीड जिल्ह्यातील तब्बल ११ ऊसतोड कामगारांचा अवघ्या २० दिवसांच्या आत वेगवेगळ्या अपघातांमध्ये बळी गेला आहे. या भीषण आणि हृदयद्रावक वास्तवाने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला असून, घरचा कमावता माणूस गेल्याने हवालदिल झालेल्या कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने आणि तीव्र दुष्काळामुळे शेतीचे कंबरडे मोडले आहे. गावात रोजगाराचा आणि जगण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसल्याने, शेकडो कुटुंबे आपले बाळगोपाळ सोबत घेऊन ऊसतोडीसाठी परराज्यात आणि परजिल्ह्यात जाण्यास मजबूर झाली. एक महिन्यापूर्वीच या मजुरांचे स्थलांतर सुरू झाले होते. मात्र, प्रवासाचे अतोनात हाल, विनाआराम रात्रंदिवस करावी लागणारी मेहनत आणि सुरक्षेचा पूर्णपणे अभाव यामुळे निष्पाप मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये अर्जुन श्रीकिसन रसाळ, अशोक भगवान शिंदे, सोनाली श्रीराम फड, फुलचंद रखमाजी गायकवाड, हनुमंत रामभाऊ पाळवदे, अमोल बंडू तिडके, अभिमान जावळे, संदिपान मुंडे, संजय गोरे आणि बाबासाहेब तोगे आदी मजुरांचा समावेश आहे. या अचानक झालेल्या आघातामुळे मृत मजुरांच्या बालकांवरील पित्याचे किंवा मातृछत्र कायमचे हरपले आहे.
----
दुष्काळ अन् स्थलांतराची सक्ती
यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आणि रब्बीचीही आशा मावळली. गावात काम नसल्याने पोटाची आग विझवण्यासाठी मजुरांना नाइलाजाने ऊसतोडीसाठी स्थलांतर करावे लागले. मात्र, पोटासाठी केलेले हे स्थलांतर त्यांच्या जीवावर बेतले असून, गरिबांच्या नशिबी मरणच आल्याची संतापजनक आणि दुर्दैवी भावना व्यक्त होत आहे.
-----
साथीदार गेल्याने संसार मोडला
ऊसतोड कामगारांचे आयुष्य हे जन्मापासूनच संघर्षाचे प्रतीक असते. ऊन, वारा, पाऊस सहन करत रात्रंदिवस कबाडकष्ट करणे हाच त्यांचा स्थायीभाव आहे. मात्र, या संघर्षात ज्याच्यासोबत संसाराचा गाडा हाकायचा, तोच जीवनसाथी अपघातात हिरावला गेल्याने हतबल महिला आणि कुटुंबांचा संसार कोलमडून पडला आहे. पहिलेच नशिबी संघर्ष आलेला, त्यात कमवणारा माणूसच गेल्याने आता जगायचे कसे? असा टाहो हे कुटुंबीय फोडत आहेत. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि घरात खायला अन्नाचा कण नाही, अशी दयनीय अवस्था या कुटुंबांवर ओढवली आहे.
------
कोट
दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मागील २० दिवसांत जिल्ह्यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त कुटुंबांना शासनाने केवळ तोंडी आश्वासने न देता, ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक पीडित कुटुंबाला तातडीने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
- कृष्णा तिडके, अध्यक्ष, ऊसतोड कामगार संघटना