गावागावांत आतषबाजी, फडात कोयत्यांचा आवाज
-----
दिवाळीतही ऊसतोड मजुरांचे काम सुरूच; घरी परतल्यावरच सण
---
जळकोट, ता. ९ (बातमीदार) ः ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैल भटकंती करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या आयुष्यात या सणाचा आनंद औषधापुरताही उरलेला नाही. वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी ऊस गळीत हंगामातील कमाईवरच अवलंबून असलेल्या या मजुरांची दिवाळी यंदाही उसाच्या फडातच भाकर-तुकड्यावर साजरी होत आहे.
गावागावांत रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना शेतशिवारात मात्र ऊसतोडणीच्या कोयत्यांचा आवाज घुमत आहे. दुष्काळी भागांतून स्थलांतरित झालेले मजूर कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता पहाटेच पत्नी व लहान मुलांसह फडात दाखल होतात. दिवसभर काबाडकष्ट करून चटणी-भाकरीवर भूक भागवून सायंकाळी उशिरा तात्पुरत्या उभारलेल्या पालांकडे परततात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदर आंदोलनानंतर बहुतांश साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक भागांतून आलेल्या ऊसतोड टोळ्यांची फडात लगबग वाढली आहे.
----
गावी परतल्यावरच सण
मुकादम, वाहनमालक आणि कंत्राटदारांकडून घेतलेली उचल याच साडेतीन-चार महिन्यांच्या हंगामात फेडण्याचे मोठे बंधन या मजुरांवर असते. ‘हंगामातील मोजक्या महिन्यांत जास्तीत-जास्त ऊस तोडला, तरच चार पैसे हातात पडतात. त्यातून घेतलेली उचल फिटून पुढील पावसाळ्यातील संसाराचा गाडा हाकण्यासाठी काही रक्कम शिल्लक राहते. त्यामुळे लहान मुलांना सोबत घेऊन फडात राबण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. गावी परतल्यानंतरच काय तो सण, अशी व्यथा हे मजूर बोलून दाखवितात.
---
((कोट))
स्थानिक ऊसतोड टोळ्या साधारणपणे दिवाळीनंतर कामाला सुरवात करतात. मात्र, यंदा ऐन दिवाळीच्या तोंडावर ऊसदराचा तोडगा निघाल्याने कारखाने सुरू झाले आणि परराज्यांतील टोळ्यांना कामावर राहावे लागले. या मजुरांचीही दिवाळी गोड व्हावी, यासाठी दरवर्षी तयार फराळ, फटाके आणि कपडेलत्ते देऊन सहकार्य करतो.
- धोंडीराम राठोड, टोळी मुकदम
------