लातूर : सुरताल संगीत महाविद्यालय व रोटरी क्लबतर्फे आयोजित ‘सुरताल संगीत महोत्सवा’त गायन करताना अंगद गायकवाड.
-
बहारदार शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध
------
सुरताल संगीत महोत्सवात अंजली, नंदिनी आणि अंगद गायकवाड यांचे गायन
--
लातूर, ता. ९ : गुरुवर्य पं. शांताराम चिगरी व शकुंतलादेवी चिगरी यांच्या स्मरणार्थ सुरताल संगीत महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरताल संगीत महोत्सवा’त शास्त्रीय गायनाच्या बहारदार सादरीकरणाने लातूरकर रसिक मंत्रमुग्ध झाले. अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आणि अंगद गायकवाड यांच्या प्रभावी गायकीने रसिकांची मने जिंकली.
यावेळी सुमित्रा शांताराम चिगरी, तुकाराम पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्राचार्य नीलेश राजमाने आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष रमेश चिल्ले, सोनू डगवाले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात नंदिनी गायकवाड हिच्या गायनाने झाली. तिने राग बागेश्रीमध्ये विलंबित एकतालातील ‘सखी मन लागो ना’ हा बडा ख्याल सादर करून मैफलीला सुरेल प्रारंभ करून दिला. त्यानंतर द्रुत एकतालातील ‘डालो रंग मुँह पे ना’ हा छोटा ख्याल सादर केला. अखेरीस ‘चाहत सुधा सुरन गाना को’ ही ठुमरी सादर करून नंदिनीने रसिकांना भावसंगीताचा आनंद दिला. यानंतर अंजली गायकवाड हिने राग पुरिया सादर केला. तिने झुमरा तालातील ‘प्यार दे गर लागी’ हा बडा ख्याल अत्यंत प्रभावीपणे सादर केला. त्यानंतर तीनतालातील ‘रूप जो बन का मान न करिये’ हा छोटा ख्याल सादर करून आपल्या स्वरवैविध्याची प्रचिती दिली.
कार्यक्रमाचा उत्तरार्ध अंगद गायकवाड यांनी गाजवला. त्यांनी राग शुद्ध कल्याणमध्ये विलंबित एकतालातील ‘बोल न लागी’ हा बडा ख्याल सादर केला. त्यानंतर तीनतालातील ‘मंदलवा बाजो रे’ हा छोटा ख्याल सादर केला. कार्यक्रमाचा समारोप राग भैरवीतील ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ या भावपूर्ण रचनेने झाला. यावेळी तानपुरावर पूजा दहिफळे, हार्मोनिअमवर विजय श्रीमंगले, तबल्यावर चैतन्य पवार, तर पखवाजवर विष्णू जगताप यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर पाटील यांनी कले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी मीनाक्षी कोळी, अमर कडतने, डॉ. संदीप जगदाळे, व्यंकट काळे, शिवाजी कंदगुळे, महेश काकनाळे, राहुल कांबळे, तेजस धुमाळ, हरीश कुलकर्णी, यशोदा जगताप, दिनेश पोखरकर, प्रसाद उमरदंड यांनी परिश्रम घेतले.
---