मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्यांवर निलंबनाचा बडगा | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यालय
मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्यांवर निलंबनाचा बडगा

औरंगाबाद : मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्यांवर निलंबनाचा बडगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अनलॉक होत असताना कोरोनाचा धोका अधिक वाढू नये यासाठी जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण गरजेचे आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे. तसेच मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. १९ ) जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटने, पोलिस उपअधीक्षक श्री. बनसोड, महपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा आदी उपस्थित होते.

हेही वाचा: औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेच्या परीक्षार्थींना एसटी बंदचा फटका

बैठकीत प्रत्येक तालुक्यातील लसीकरणाचा आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, लसीकरण कमी असणाऱ्या भागांत तलाठी, तहसीलदार, ग्रामसेवक, बीडीओ तसेच आरोग्य अधिकारी यांनी सकाळी दहापूर्वी व सायंकाळी सहानंतर भेटी द्याव्यात. लोकांचे लसीकरणासंबंधी प्रबोधन करावे. बाजाराच्या ठिकाणी लसीकरण केंद्र उभारावेत. लसीकरणाला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज ओळखून शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी ऐच्छिक ''आशा कर्मचारी'' नेमावेत. आरोग्य कर्मचारी वेळेवर कामास उपस्थितीत नसेल अथवा अधिकारी कर्मचारी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसतील तर त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

तातडीने घाटी येथे तळमजल्यावर मानसोपचार वॉर्डजवळ व जिल्हा रुग्णालय चिकलठाणा येथे अशा दोन ठिकाणी २४ तास लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.लसीकरणासंदर्भात लोकांचे प्रबोधन व्हावे यासाठी सर्व डॉक्टरांना रुग्णांचे vaccination certificate तपासणे बंधनकारक करण्यात येणार असून लसीकरण न केलेल्या रुग्णाला लसीकरणाचे महत्त्व समजून सांगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी केले आहे. श्री. गटाने, श्री. बनसोड यांनी सूचना केल्या.

loading image
go to top