दुष्काळात फळबागा जगविण्यासाठी रविवारी कार्यशाळा
उदगीर : अति घन आंबा लागवड, बाग व्यवस्थापन व निर्यातीविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
--
उदगीर, ता. १९ (बातमीदार) : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. विशेषतः फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर फळझाडे जगविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळात फळबागांचे संरक्षण व व्यवस्थापन कसे करावे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
डोंगरशेळकी तांडा परिसरातील कृषी महाविद्यालयात रविवारी (ता.२२) सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. ‘दुष्काळात फळबागा कशा जगवायच्या’ हा कार्यशाळेचा मुख्य विषय असून, यामध्ये अति घन आंबा लागवड, आंबा बागेचे व्यवस्थापन, आंबा विक्री आणि निर्यात अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून फळबागा टिकविणे, आंबा लागवडीच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करणे, उत्पादनवाढीसाठी आवश्यक व्यवस्थापन आणि उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विक्री व निर्यातीच्या संधी याविषयी या कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे, शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी केले आहे.