--
जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा समारोप
---
महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध उपक्रम; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
---
नांदेड, ता. ३ : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याचा नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त सहभाग आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत दिवस साजरा करून समारोप करण्यात आला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ग्रामीण भागात स्वच्छता, जनजागृती आणि लोकसहभागावर भर देण्यात आला.
या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर महाश्रमदान, अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणे, शाळा व अंगणवाडी परिसराची स्वच्छता करण्यात आली. बाजारपेठा, बसस्थानके आदी ठिकाणीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ओला, सुका व घातक कचरा स्वतंत्रपणे संकलित करून त्याचे वर्गीकरण व योग्य व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली. शाळांमध्ये निबंध स्पर्धा, स्वच्छता उपक्रम तसेच ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तू निर्मितीचे उपक्रम घेण्यात आले. प्लास्टिक कचरा निर्मूलन, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व देखभाल तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासह विविध विभागांनी अभियानात सक्रिय सहभाग घेतला. ग्रामपंचायती, विद्यार्थी, युवक, सफाई कर्मचारी व नागरिकांच्या सहभागामुळे अभियानाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.