तावरजा नदीत तरंगणाऱ्या मृतदेहाच्या खुनाचा छडा

तावरजा नदीत तरंगणाऱ्या मृतदेहाच्या खुनाचा छडा
Published on: 
तावरजा नदीकाठच्या मृतदेहाचे गूढ उकलले ---- प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; औसा पोलिसांकडून तिघांना अटक --- औसा, ता. १४ (बातमीदार) : तालुक्यातील भुसणी शिवारातील तावरजा नदीच्या पात्रात चार नोव्हेंबरला पाण्यावर तरंगताना आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचा राग मनात धरून तरुणाचे अपहरण करून खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले. याप्रकरणी चौघांविरुद्ध औसा पोलिस ठाण्यात खुनासह अपहरण आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, घटनेतील तीन संशयितांना औसा पोलिसांनी अटक केली. तुकाराम ऊर्फ सोनू बाबूराव गिते (वय २५, रा. नंदागौळ, ता. परळी वैजनाथ, जि. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे लातूर येथील महाराणा प्रतापनगर तांडा परिसरातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघेही विवाह करणार असल्याची माहिती तरुणीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी या संबंधांना विरोध केला होता. याच कारणावरून संशयितांनी संगनमत करून तुकाराम गिते याचे ऑटोमधून अपहरण केले. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह भुसणी येथील तावरजा नदीच्या पाण्यात टाकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच मृताची दुचाकी आणि मोबाइल घेऊन जाऊन पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर बाबूराव गिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी मारोती सूर्यवंशी (वय ५७), ललिता बालाजी सूर्यवंशी (वय ४९), आनंद बालाजी सूर्यवंशी (वय २५, सर्व रा. लातूर) आणि पांडुरंग चंदर यादव (वय ३८, रा. बोरफळ, ता. औसा, ह.मु. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. --- पहाटे गुन्हा दाखल एक नोव्हेंबरच्या रात्रीपासून चार नोव्हेंबरच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे. शनिवारी (ता. १४) पहाटे औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक आर.के. डमाळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.