(टुडे १ बॅनरसाठी)
---
गुणवंत शिक्षक पुरस्कार यंदाही लांबणीवर
शिक्षकदिनीही शिक्षकांच्या पदरी निराशाच, चार वर्षांपासून पुरस्काराबाबत प्रशासन उदासीन
---
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ५ ः विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी वर्षभर मेहनत घेणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यासाठी दिले जाणारे जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार यंदाही शिक्षकदिनी मिळाले नाहीत. जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी प्राथमिक, माध्यमिक व विशेष प्रवर्गातील २० शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. मात्र, निवड प्रक्रिया आणि प्रशासकीय मंजुरीला झालेल्या विलंबामुळे गतवर्षीचे पुरस्कारही रखडले असून, यंदाचे पुरस्कारदेखील शिक्षक दिन उलटून गेल्यानंतर प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान करणाऱ्या पुरस्कारालाच प्रशासनाच्या दिरंगाईचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी प्रत्येक तालुक्यातील एक माध्यमिक, एक प्राथमिक असे एकूण १८ व दोन विशेष, असे एकूण २० पुरस्कार दिले जातात. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी वर्षभर झटणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे गुणवंत शिक्षक पुरस्कार दिले जातात. मात्र, शिक्षकांचा सन्मान करण्याची जबाबदारी असलेल्या परभणी जिल्हा परिषद शिक्षण विभागालाच या पुरस्कारांचा विसर पडल्याचे चित्र आहे. विहित वेळेत प्रक्रिया पूर्ण न करणे व विभागीय आयुक्तांची परवागणी न घेणे हे नेहमीचेच झालेले असून त्यामुळे गुणवत्ताधारक शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहिले आहेत. यंदाही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता कायम असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. राज्यातील विविध जिल्हा परिषदांमध्ये गुणवत्ताधारक शिक्षकांचा सन्मान करून पुरस्कारही दिले जातात. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील शिक्षकांचा गौरव होत असताना परभणीतील पात्र शिक्षकांना आपल्या पुरस्काराची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.
---
गतवर्षीचे पुरस्कार गेले कुठे?
जिल्हा परिषदेकडून दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यातील पुरस्कार जानेवारी महिन्यात कसेबसे देण्यात आले, तर मागील वर्षी या पुरस्कारांचे वितरणच झाले नाही. दरवर्षी विहित वेळेत शिक्षक पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांकडून प्रस्ताव मागविणे, त्यांची छाननी करणे, गुणांकन करणे आणि निवड समितीच्या माध्यमातून अंतिम निवड करणे अपेक्षित असते. परंतु, तसे होताना दिसून येत नाही. निवड प्रक्रियेला प्रचंड विलंब होतो. गतवर्षी पुरस्कारासाठी पात्र ठरू शकणाऱ्या शिक्षकांनी आपले प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, प्रशासकीय पातळीवरील दिरंगाईमुळे अंतिम टप्प्यावर प्रक्रिया रखडली. परिणामी, शिक्षकांच्या कामाचा गौरव करण्याऐवजी त्यांच्या पदरी प्रतीक्षाच पडली. वेळेअभावी शिक्षकदिनी पुरस्कारांचे वितरण करता आले नाही. परंतु, किमान या महिन्यात तरी पुरस्कार प्रदान व्हावेत, अशी अपेक्षा आहे. तरच या पुरस्कारांचे महत्त्व कायम राहील.
--
शिक्षक पुरस्कार म्हणजे शिक्षकांच्या कामाची दखल आणि गुणवत्तेचा सन्मान, हा उद्देश आहे. मात्र, परभणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कारभाराकडे पाहता कागदी कार्यवाहीला प्राधान्य आणि प्रत्यक्ष निर्णयाला विलंब, अशी परिस्थिती आहे. अनेक शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करीत आहेत. पुरस्कार देणे म्हणजे केवळ एका शिक्षकाचा गौरव नव्हे, तर संपूर्ण शिक्षक समुदायाला प्रोत्साहन देणे होय. मात्र, पुरस्काराची प्रक्रिया रखडत असेल, तर गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळणार कसे?
- महेश पाटील, शिक्षणतज्ज्ञ
---
संघटना पातळीवर नेहमीच शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला जातो. तसेच पुरस्कार वेळेत मिळावेत म्हणूनदेखील पाठपुरावा केला. गतवर्षी दोन वेळा तारखा जाहीर झाल्या. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे ते प्रदान केले गेले नाहीत, ही खंत आहेच. परंतु, प्रशासनानेदेखील शिक्षकदिनी पुरस्कार मिळाले पाहिजेत, असे नियोजन करणे आवश्यक आहे.
- किशनराव इदगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
---
आपण रुजू झाल्यानंतर शिक्षक पुरस्कार वेळेवर दिले जावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विभागीय आयुक्त कार्यालयाची परवानगीदेखील मिळाली आहे. गतवर्षीचे व या वर्षाचे असे दोन्ही पुरस्कार दिले जाणार आहेत. लवकरात लवकर हे पुरस्कार प्रदान करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
- श्रद्धा झिंजुरके, शिक्षणाधिकारी (प्रा.), शिक्षण विभाग
...................