ग्रामपंचायतीचे काम शिक्षकांच्या माथी!
ग्रामसभेच्या सचिवपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली; शिक्षकांमध्ये नाराजी
घनसावंगी, ता. ३१ ः ग्रामसभेच्या कामकाजासाठी सचिव म्हणून काम करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत यंत्रणेशी संबंधित आहे. मात्र, ग्रामपंचायत विभागातील मनुष्यबळाऐवजी अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पर्यायी सचिव म्हणून नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षक व मुख्याध्यापकांनाही ग्रामसभेचे सचिव म्हणून काम सोपविण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पंचायत समिती, घनसावंगी येथील ग्रामपंचायत विभागाने २१ ऑगस्ट २०२६ रोजी काढलेल्या पत्रात ग्रामसभेच्या कामकाजासाठी अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पर्यायी सचिव म्हणून नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करण्याचे नमूद केले आहे. या पत्रात मुख्याध्यापक, तलाठी, अंगणवाडी सेविका आदींच्या माध्यमातून ग्रामसभेच्या सचिवपदाचे कामकाज करण्याचा उल्लेख आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागाशी संबंधित नसलेली आणि अन्य विभागांकडून शिक्षकांना देण्यात येणारी कामे ही अशैक्षणिक कामे ठरतात.
.......
कोट :
जर प्रशासनाला शिक्षकांची मदत घ्यायचीच असेल, तर ती केवळ शैक्षणिक किंवा ग्रामविकास विषयक सल्ल्यापुरती मर्यादित असावी. ग्रामपंचायतीच्या सचिवपदाची तांत्रिक व कायदेशीर जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवरच सोपवणे दोन्ही विभागांच्या हिताचे ठरेल.
- विलास मूळक, मुख्याध्यापक